आपत्तींवर मात करुन जिल्हा पुन्हा सुजलाम् सुफलाम् करुया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:36 AM2021-08-17T04:36:54+5:302021-08-17T04:36:54+5:30

रत्नागिरी : आपत्तीमागून आपत्ती झेलत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेसोबत शासन व प्रशासन सदैव आहे आणि आपली भूमिका पार पाडत ...

Let's overcome the calamities and make the district prosperous again | आपत्तींवर मात करुन जिल्हा पुन्हा सुजलाम् सुफलाम् करुया

आपत्तींवर मात करुन जिल्हा पुन्हा सुजलाम् सुफलाम् करुया

googlenewsNext

रत्नागिरी : आपत्तीमागून आपत्ती झेलत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेसोबत शासन व प्रशासन सदैव आहे आणि आपली भूमिका पार पाडत आहे. संकटांची ही मालिका संपवून आपण जिल्ह्याला पुन्हा एकदा सुजलाम् सुफलाम् करुया, असे आवाहन पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात केले.

येथील पोलीस मुख्यालयातील पोलीस परेड मैदानावर हा ध्वजारोहण सोहळा झाला. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री परब यांनी पोलीस दलाची मानवंदना स्वीकारली. अतिवृष्टी व दरड दुर्घटनेत ज्यांनी प्राण गमावले त्यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग उपस्थित होते.

पालकमंत्री परब म्हणाले की, कोरोनाच्या महामारीचा आपण गेल्या दीड वर्षापासून मुकाबला करतोय, आता व्यवहार सुरळीत होत असले तरी आता तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षित अंतराचे पालन करणे, मास्कचा वापर करणे व हातांची स्वच्छता ठेवणे या त्रिसुत्रीचे पालन सर्वांनी कोटकोरपणे करावे. कोरोनावर मात करण्यासाठी शासन पूर्ण प्रयत्न करत आहे आणि तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत सर्व पूर्वतयारी प्रशासनाने केली आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे सध्या आपल्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. ग्राम कृती दलांनी केलेल्या उत्तम कामामुळे जिल्ह्यातील १,५३४ गावांपैकी १,२१४ गावे काेरोनामुक्त झाली आहेत. ग्रामपंचायतींना यासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून २५ टक्के रक्कम खर्च करण्याची परवानगी शासनाने दिली आहे.

कोविडवरील उपचार व क्षमता वर्धन करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर निधीतून ३० टक्के रक्कम म्हणजे ७५ कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. ज्यातील ३८ कोटी रुपयांच्या रकमेला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. जिल्ह्यात ९२.४७ मेट्रिक टन ऑक्सिजन साठा व निर्मिती होत आहे, हे खरोखर उल्लेखनीय काम आहे. ऑक्सिजन सिलिंडर्सची संख्याही ६६८पर्यंत वाढविण्यात आली आहे.

कोविड, नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळ, तौक्ते व अलिकडील अतिवृष्टी या सर्व संकटांच्या मालिकेत प्रत्येकवेळी शासन आपल्या पाठीशी उभे राहिले आहे. निसर्ग चक्रीवादळातील बाधितांना नुकसानभरपाई देताना सर्व निकष बदलून शासनाने मदत केली. यात १ लाख ९ हजार २२६ बाधितांना १५३ कोटी ७० लाख १६ हजार रुपये मागणीच्या १०० टक्के मदत वाटप पूर्ण झाले आहे. तौक्ते चक्रीवादळातील बाधितांना मदतीचेदेखील वाटप करण्यात येत आहे. अतिवृष्टीत बाधित गावांमधील तातडीच्या दुरुस्तीच्या कामांसाठी जिल्हा नियोजन निधीमधून ४ कोटी ५६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Let's overcome the calamities and make the district prosperous again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.