कदमांची अनामत जप्त करू
By admin | Published: May 14, 2016 11:58 PM2016-05-14T23:58:15+5:302016-05-14T23:58:15+5:30
रामदास कदम : आमदारांच्या गावातच सभा घेणार
खेड : आमदार संजय कदम हे निव्वळ खोटारडे आमदार आहेत. त्यांना भगतगिरी करण्यामध्ये रस आहे. अशा आमदाराला आगामी निवडणुकीत खेडमध्ये पाय ठेवू देणार नाही, त्यांची अनामत जप्त करणारच, असा चंग पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बांधला आहे. ते आपल्या निवासस्थानी जामगे येथे पत्रकारांशी बोलत होते़
संजय कदम यांच्याच चिंचघर गावात जाहीर सभा घेऊन त्यांचेच कारनामे उघडे करणार, असा घणाघात रामदास कदम यांनी आमदार संजय कदमांवर केला आहे. कदम यांच्या जामगे गावातील ग्रामदेवता कोटेश्वरी मानाई देवीच्या उत्सवानिमित्त ते जामगे येथे आले आहेत. यावेळी त्यांच्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते.
दापोली विधानसभा क्षेत्राकरिता २०० कोटी रूपये आपण दिले. मात्र संजय कदम यांनी हा निधी आपण आणल्याचे लोकांना दाखवित या विकासकामांचे नारळदेखील फोडले. श्रेय घेण्याचे काम संजय कदम करतात. स्वत: किती पैसे आणले त्याचा हिशोब सरकारला द्या आणि जनतेलाही द्या, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
शिवसेनेशी गद्दारी करत राष्ट्रवादीचा आधार घेणारे संजय कदम आता जिल्हा परिषदेच्या पाईप भ्रष्टाचारामध्ये गुंतले आहेत. एकेका नळपाणी पुरवठा योजनेची चौकशी लावीन. आता स्वस्थ बसणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला़ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांची पावले ही सेनेकडे वळली आहेत़ त्यामुळे आमदार संजय कदम यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे कदम यावेळी म्हणाले.
विकासकामांबाबत जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत मंत्र्यांनी आणलेल्या निधीच्या कामांचे श्रेय घेत नारळ फोडण्याचा धडाका लावणाऱ्या संजय कदम यांना आता ‘नारळ फोडे आमदार’ म्हणून लोक हिणवू लागले आहेत. आगामी निवडणुकीत त्यांचे राजकीय अस्तित्व संपवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे सांगत चिंचघर येथील जाहीर सभेमध्ये संजय कदमांची नौटंकी जनतेसमोर मांडणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दौरा... : राजकीय वातावरण तापले
रामदास कदम यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. कदम यांनी आमदार संजय कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याला आता संजय कदम कसे उत्तर देणार? याबाबत कुतुहल आहे.
४मंत्र्यांनी आणलेल्या निधीच्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न : कदमांची टीका.
४संजय कदम हे नारळफोडे आमदार : रामदास कदम.
गावांशी संपर्क...
रामदास कदम यांनी खेडकडे लक्ष पुरवताना सध्या काही गावांशी संपर्क करून तेथील ग्रामस्थांना शिवसेनेकडे वळविण्याचा प्रयत्नही केला आहे.