कोकणचं कोकणपण जपूया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:28 AM2021-07-26T04:28:49+5:302021-07-26T04:28:49+5:30
कोकण म्हणजे फक्त रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग नव्हे तर अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये वसलेला भाग म्हणजे कोकण ...
कोकण म्हणजे फक्त रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग नव्हे तर अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये वसलेला भाग म्हणजे कोकण ! आणि कोकणात पाऊस नाही तर काय असणार? अहो ! आपल्या कोकणातला प्रत्येक माणूस अगदी अभिमानाने म्हणतो, ‘मी अमुक अमुक पावसाळे बघितलेत ! अहो आजपर्यंत पुलाखालून खूप पाणी गेलेले बघितले.’
गुजरातपासून अगदी कारवारपर्यंतचा भाग म्हणजे कोकण! ज्या कोकण प्रांताला एका बाजूला सुमारे १,६०० किलाेमीटरचा पश्चिम घाट लाभला आहे आणि पायथ्याशी अरबी समुद्राची गाज आहे. एकूण चार राज्यांंमध्ये (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ) कोकण प्रांत वसलेला आहे. याच भूमीला अपरांत भूमी किंवा परशुराम भूमी म्हणून ओळखले जाते.
आज पावसाने सगळ्या कोकणात हाहाकार माजवलेला असताना, सगळीकडे पुराचे पाणी, दरडी कोसळत असताना मदतीसाठी हात पुढे येत आहेत. कोकणी माणूस कधीच मागे राहत नाही, तो आखडता हातही घेत नाही. या कोकणी माणसाने दुसऱ्या क्षणापासून मदतीच्या ओघाला सुरुवातही केली आहे.
पण याच कोकणी माणसाला आता काही पर्यावरणवादी धडे द्यायला पुढे सरसावलेले दिसत आहेत. मंडळी मी पर्यावरणवादाच्या विरोधात नाही की विकासवादाचा मारेकरीही नाही. पण हे असं किती दिवस चालणार आहे? किती दिवस आपण निसर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार आहोत. अहो, या सगळ्यावरुन राजकारण हे होतच राहणार, राजकारणी निसर्गावर खापर फोडून मोकळे होणार, मोठमोठ्या घोषणा होणार, पुनर्वसन, स्थलांतर, ह्यांव नी त्यांव!
निसर्गाची कमीतकमी हानी करुन कोकणचा विकास झाला तर भविष्यात अशा घटना कोकणात घडणार नाहीत. मला आठवतं आमचं बालपण ! अहो, आम्ही शाळेत जायचो ना तेव्हा कधी-कधी १५ / १५ दिवस आम्ही सूर्य पाहायचो नाही, इतका पाऊस असायचा. नद्या-नाले तुडुंब भरुन वाहायचे, मग का कधी असं कुठे पुराचं पाणी येत नव्हतं कुणाच्या संसारात का कधी डोंगर वाड्या-वस्त्यांवर येऊन सगळं उद्ध्वस्त करत होते, नाही ना? आम्ही शाळेतून येताना आम्हाला मध्ये एक वहाळ लागायचा, पावसाळ्यात बऱ्याचदा भरुन वाहायचा, नाही त्याने कधी कुणाचा जीव घेतला. थोडावेळ थांबायचो आम्ही, पाणी उतरायचं नाहीतर कोणी तरी यायचं आणि आम्हाला खांद्यावर उचलून घेऊन वहाळ पार करुन द्यायचं. ना कुठल्या वहाळावर की नदीवर पूल होते. तेव्हाही विकास या कोकणात हळूहळू येत होता. सगळं सावरत सावकाशीने येत होता !
आम्ही लहान असतानाच आमच्या गावात वीज आली पण त्या विजेने नाही बळी घेतले मोठमोठ्या वृक्षांचे की नाही जेसीबीने डोंगर पोखरले, आमचे आजी आजोबा, आई - बाबा या विकासाचे मनापासून स्वागत करत होते. पण निसर्गाप्रति असणारे आपले कर्त्यव्य मात्र कधीच विसरत नव्हते. त्यानी जंगले तोडून कधी बागायती करण्याचा हट्ट नाही धरला. उलट बागायती करताना इतर जंगली झाडांनाही जगू दिलं, जगवलं !
कोकणच्या या ऱ्हासाला इथे येणारे विकासाचे प्रकल्प कारणीभूत नाहीत तर आपण कोकणवासीच कारणीभूत आहोत. होय, होय ! आपणचं कारणीभूत आहोत आणि आपणचं आपली पोटं भरण्यासाठी उभ्या केलेल्या एनजीओ कारणीभूत आहेत. जगाबरोबर कोकणचाही विकास झाला पाहिजे पण इथल्या माणसाने निसर्गाचे अस्तित्व मान्य करायला हवे. इथेच एखादी नोकरी करण्यासाठी एखादा प्रकल्पही आमच्या कोकणात यायला हवा पण आमचा निसर्ग आम्हीच शाबूत ठेवला पाहिजे. अहो, गेल्या अनेक दशकांपासून कोकणात कुऱ्हाडबंदी कायम आहे. पण ती फक्त कागदावर! कोकणात एखादा प्रकल्प येत असेल ना तर जसं त्याच्याविरोधात उभे राहण्यासाठी एनजीओ बनून कोसो दूर येता ना तसंच आता माझा कोकण वाचवण्यासाठी या. वाड्या-वस्त्यांवर, पाड्यापाड्यांवर जाऊन जंगलं वाढवुया, नद्या वाचवुया ! बागायतीच्या नावावर पोखरले जाणारे डोंगर, उभे सरळ कापले जाणारे डोंगर वाचवुया. नाहीतर हेच डोंगर उद्या आपल्या वाड्या-वस्त्यांवर येतील. हो ! चला कोकणचा विकास करुया पण कोकणचं कोकणपण जपत !
- विनोद पवार, राजापूर