सामाजिक न्याय भवन येथील कोरोना सेंटरमध्ये रुग्णांसाठी वाचनालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:22 AM2021-06-24T04:22:03+5:302021-06-24T04:22:03+5:30
रत्नागिरी : विविध कोविड केअर सेंटरमध्ये जे पेशंट उपचारांसाठी दाखल होतात, त्यांना दाखल कालावधीत त्यांच्या मनात सकारात्मक विचार जर ...
रत्नागिरी : विविध कोविड केअर सेंटरमध्ये जे पेशंट उपचारांसाठी दाखल होतात, त्यांना दाखल कालावधीत त्यांच्या मनात सकारात्मक विचार जर आपण संक्रमित केले तर त्यांना बरे होण्यासाठी चांगला फायदा होईल, या विचारातून हेल्पिंग हँडस आणि कीर्तनसंध्या यांच्या पुढाकाराने आणि कै. कुसुमताई अभ्यंकर सार्वजनिक ग्रंथालयाच्या सहकार्याने कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवनमधील कोरोना केअर सेंटरमध्ये वाचनालय सुरू करण्यात आले आहे.
रत्नागिरीत सन २०१२ पासून कीर्तनसंध्या विविध सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या राबवत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हेल्पिंग हँडच्या माध्यमातून कीर्तनसंध्या परिवार या रुग्णांना सामाजिक जाणिवेतून सर्वतोपरी मदत करत आहे. हे करत असताना सध्या विविध कोविड केअर सेंटरमध्ये जे पेशंट उपचारांसाठी दाखल होतात, त्यांना दाखल कालावधीत त्यांच्या मनात सकारात्मक विचार संक्रमित केले तर त्यांना बरे होण्यासाठी चांगला फायदा होईल, असा विचार या स्वयंसेवकांच्या मनात उभा राहिला. सकारात्मक विचार संक्रमित करण्यासाठी पुस्तक हाच एकमेव पर्याय डोळ्यासमोर आला. मात्र, यासाठी कुणाचे सहकार्य घ्यायचे, हे ठरवत असतानाच कै. कुसुमताई अभ्यंकर सार्वजनिक ग्रंथालय यांचे नाव समोर आले. ग्रंथालयाचे अध्यक्ष बापट, श्रीकृष्ण साबणे यांच्यासमोर हा विचार मांडला. त्यांनीही क्षणाचा विलंब न लावता कोविड केअर सेंटरमधील उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी काही प्रेरणात्मक अशी १०० पुस्तके सर्व खबरदारी घेऊन वापरण्यास द्यायला संमती दिली. व मंगळवारपासून ही पुस्तके हेल्पिंग हँड आणि कीर्तनसंध्या यांच्यातर्फे देऊ केली.
आता तिथे छोटेखानी वाचनालयच तयार झाले आहे. तिथे असणाऱ्या रुग्णांनी पुस्तक नीट वाचून परत करण्याच्या अटीवर तेथील कार्यालयामधून पुस्तक घ्यावे आणि तिथे दाखल असेपर्यंत वाचून ते नीट सुस्थितीत परत करावे. जेणेकरून अन्य रुग्णांनाही चांगली पुस्तके वाचायला मिळतील व चांगले विचार संक्रमित होतील.
या उपक्रमाला हेल्पिंग हँड टीम, कीर्तनसंध्या परिवार, कोविड सेंटरमधील श्रध्दा मॅडम, कै. कुसुमताई अभ्यंकर सार्वजनिक ग्रंथालयाचे, श्रीकृष्ण साबणे, अध्यक्ष बापट, वाचनालयाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.