वाचनालय कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण
By admin | Published: September 5, 2014 10:46 PM2014-09-05T22:46:30+5:302014-09-05T23:30:01+5:30
ऋण काढून सण साजरा : अनुदानाचा वार्षिक दुसरा हप्ता अद्याप मिळालाच नाही
सिंधुदुर्गनगरी : सार्वजनिक वाचनालयाच्या अनुदानाचा वार्षिक दुसरा हप्ता अद्याप न आल्याने कर्मचाऱ्यांच्या गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. अबकड या दर्जाची जिल्ह्यात सार्वजनिक वाचनालये आहेत. या वाचनालयाला शासनाचे अनुदान मिळते. वर्षातून दोन टप्प्यात मिळणाऱ्या अनुदानाचा दुसरा हप्ता आॅगस्टअखेर येतो. अद्याप हप्ता न आल्याने कर्मचाऱ्यांची परवड झाली आहे.
अत्यल्प मानधनात कर्मचारी वाचनालयांची सेवा बजावित आहेत. वाचनालयातील नोकरीवरच त्यांचा चरितार्थ चालतो. सहा महिन्यांनी येणाऱ्या अनुदान हप्त्यातून संबंधित संस्था त्यांना मानधन देते. काही संस्थाचालक त्या मानधनातही काटछाट करून कर्मचाऱ्यांना जेरीस आणीत आहेत.
त्याही परिस्थितीत कर्मचारी आपली सेवा बजावित आहे. आता तर आॅगस्टअखेर अनुदान न आल्याने गणेश चतुर्थी उत्सवाचा आनंद हरवलेला आहे. उसनवारी करून कर्मचारी हा सण साजरा करत आहेत. जिल्हा शासकीय ग्रंथालयाच्या माध्यमातून यापुढे जिल्ह्यातील सर्व वाचनालयांचे व्यवहार होणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. जिल्हा शासकीय ग्रंथालयाच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारामुळे कोणता फरक पडतो. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण १३१ सार्वजनिक वाचनालये आहेत. यापैकी कुडाळचे अद्ययावत एकमेव अ दर्जाचे रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय हे जिल्हा वाचनालय आहे. या वाचनालयाला वार्षिक ७ लाख २० हजार रुपये अनुदान मिळते, तर ५ तालुका अ वाचनालयांना ३ लाख ८४ हजार अनुदान, १० अ इतर ग्रंथालये २ लाख ८८ हजार अनुदान, २ ब तालुका ग्रंथालये २ लाख ८८ हजार अनुदान, ४४ ब इतर ग्रंथालये १ लाख ९२ हजार अनुदान, ४७ क इतर ग्रंथालये ९६ हजार अनुदान, २२ ड ग्रंथालये ३० हजार अनुदान अशी ग्रंथालये असून, सव्वातीनशे कर्मचारी सेवा बजावत आहेत. त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. काही कर्मचारी कुटुंबांचा चरितार्थ चालवण्यासाठी अन्य ठिकाणी रोजंदारीचेही काम करीत आहेत. अनुदान वेळेत मिळावे, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)