जिल्हा गुण नियंत्रण विभागातर्फे चार कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित
By मेहरून नाकाडे | Published: June 3, 2023 04:39 PM2023-06-03T16:39:57+5:302023-06-03T16:40:07+5:30
रत्नागिरी जिल्हा कृषि विभागातील गुणनियंत्रण विभागातर्फे निविष्ठांच्या दर्जा व गुणवत्ता तपासणी मोहिम सुरू आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषि विभागातील गुणनियंत्रण विभागातर्फे निविष्ठांच्या दर्जा व गुणवत्ता तपासणी मोहिम सुरू आहे. भरारी पथकाव्दारे . जिल्हयातील परवानाधारक कृषि सेवा केंद्राची तपासणी करताना चार कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. शिवाय ३५ मेट्रीक टन खत साठयास विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
खरीप हंगामात जिल्हयामध्ये भात व नागली ही प्रमुख दोन पिके घेतली जातात. चालू खरीप हंगामात पिक उत्पादनासाठी आवश्यक निविष्ठांचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार आवश्यक खत, बियाणे व किटकनाशके बाजारामध्ये उपलब्ध झालेली आहेत या निविष्ठांचा दर्जा व गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्हयात दहा भरारीपथक स्थापन केले असून २९ अर्धवेळ निरीक्षक कार्यरत आहेत, या निरिक्षकांतर्फे जिल्हयातील परवानाधारक कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली आहे.
या तपासणीमध्ये काही कृषी सेवा केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचे स्टॉक रजिस्टर न ठेवणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागावर न लावणे, वेळेत परवाने अदयावत न करणे, शेतकऱ्यांना बिले न देणे, परवाना काढलेला आहेत परंतु कोणताही व्यवसाय केला जात नसल्याचे तपासणी दरम्यान आढळले. त्यामुळे चार परवानाधारक कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील १, राजापुर १, चिपळुण तालुक्यातील २ परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. तसेच ३५ मेट्रीक टन खत साठयास विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हयातील सर्व परवानाधारक कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे कायदा १९६६, खत नियंत्रण आदेश १९८५ व किटक नाशके कायदा १९६८ मधील तरतुदीचे पालन करुन तपासणी पथकाला नियमानुसार सर्व कागदपत्रे उपलब्ध करुन दयावी व होणारी कारवाई व आपले नुकसान टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. कृषी सेवा केंद्राची तपासणी व परवाना निलंबनाची कारवाई जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे व गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक सागर साळुंखे यांनी केली आहे.