‘जीवन अमृत’ पाझरलेच नाही
By admin | Published: May 4, 2016 10:10 PM2016-05-04T22:10:04+5:302016-05-04T23:54:02+5:30
अल्प प्रतिसाद : रक्ताच्या तत्पर पुरवठ्याचे तीनतेरा
रत्नागिरी : रुग्णांना रक्ताचा तत्पर पुरवठा व्हावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘जीवन अमृत’ योजनेला रत्नागिरीतील नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत.
‘जीवन अमृत’ योजना ही सर्वप्रथम सातारा, सिंधुदुर्ग व पुणे या जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली होती. त्यांनतर ७ जानेवारी २०१४ रोजी संपूर्ण महारष्ट्रात ही योजना सुरू करण्यात आली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. सुरूवातीच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रबरोबरच रत्नागिरीतूनही या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला.
रुग्णांना तत्पर रक्तांचा पुरवठा व्हावा, म्हणून दोन वर्षापूर्वी ‘जीवन अमृत’ ही योजना सुरू करण्यात आली. ही सेवा महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांसाठी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये अशासकीय संस्था तयार करून ही संस्था रुग्णांपर्यंत पोहचून रक्तपुरवठा करण्याचे काम करते. ही शासकीय सेवा ४० किलोमीटरच्या आत किंवा एक तासांच्या अंतरावरील खासगी रुग्णालयांनाही पुरविण्यात येते. त्यासाठी खासगी रुग्णालयांनी रक्तपेढीची नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर टोल फ्री क्रमांक १०४ वर फोन करून गरजेनुसार मागणी करावी लागते. त्यानंतर रक्ताची अद्ययावतरित्या तपासणी करून निव्वळ तासाभरात रुग्णांना रक्तपुरवठा केला जात आहे.
या योजनेच्या सुरुवातीला नागरिकांकडूनही प्रतिसाद लाभला. सन २०१५ या कालावधीत सुमारे १९८ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. तर या चालू वर्षात जानेवारी ते एप्रिलपर्यंत ५५ रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रुग्णांनी या सेवेकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसत आहे. काही रुग्णांचे नातेवाईक हे शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीतून रक्त न घेता खासगी रक्तपेढीतून रक्त घेतात. खासगी रक्तपेढीतून रक्त घेण्यासाठी खासगी रुग्णालये प्रवृत्त करतात. त्यामुळे सामान्यांच्या भल्यासाठी सुरू झालेल्या ‘जीवन अमृत’ सेवा योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. (वार्ताहर)
सन २०१५ रोजी १९८ रुग्णांनी घेतला लाभ.
गुणवत्तापूर्वक रक्तपुरवठा तरीही नागरिकांची पाठ.
१०४ टोल फ्री वर फोन केल्यास तासभरात रक्तपुरवठा.
प्रथम सातारा, सिंधुदुर्ग व ठाणे या जिल्ह्यांतच सुरू होती जीवन अमृत योजना.
काही खासगी रुग्णालयातून रुग्णांचे नातेवाईक ांना शासकीय रक्तपेढीतून रक्त न घेता खासगी रक्तपेढ्यांतून रक्त घेण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यामुळे या सेवेकडे ते पाठ फिरवत आहेत. रत्नागिरीच्या तुलनेत इतर जिल्ह्यांमध्ये या सेवेची अवस्था अत्यंत बिकट असल्याची माहिती संबधित सूत्रांनी दिली.
लांजा, पालीत सुविधा
रत्नागिरीमध्ये अमृत जीवन ही सेवा सुरू करण्यात आली असून, लांजा व पाली याठिकाणीही ही सेवा देण्यास प्रारंभ केला जाणार आहे.