प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकराला जन्मठेप, रत्नागिरीतील हातखंबा-तारवेवाडी येथील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 12:18 PM2023-08-12T12:18:57+5:302023-08-12T12:19:44+5:30
ब्लॅकमेल करुन करत होती पैशाची मागणी. वादातून संतापून केला निर्घृण खून
रत्नागिरी : प्रेयसीच्या पाेटात सुरा भाेसकून तिचा खून केल्याप्रकरणी संताेष बबन सावंत याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही घटना हातखंबा -तारवेवाडी (ता. रत्नागिरी) १० जानेवारी २०१९ राेजी घडली असून, या प्रकरणाचा शुक्रवारी (११ ऑगस्ट) निकाल लागला.
संतोष सावंत व पत्नी सोनाली सावंत हे दाम्पत्य दोन ते अडीच वर्षांपासून हातखंबा-तारवेवाडी येथे भाड्याच्या घरात राहत होते. संतोष हा ट्रक चालक होता तर पत्नी एका हॉटेलमध्ये कामाला होती. संतोषची ओळख ज्योती ऊर्फ शमिका पिलणकर हिच्याशी झाली होती. या मैत्रीतून दोघांमध्ये अनेकवेळा अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते आणि त्याचे फोटो शमिकाने काढून ठेवले होते.
त्या फोटोची भीती दाखवून ती संतोष याला ब्लॅकमेल करत होती. कधी पाच हजार तर कधी दोन हजार अशी पैशाची मागणी करत हाेती. १० जानेवारी राेजी शमिका व संतोष यांच्यात पैशावरून वाद झाला. त्यावेळी संतापलेल्या संतोषने शमिकाच्या पोटात सुरा भोसकून तिचा निर्घृण खून केला. या प्रकारानंतर संतोष याने साक्षीदार सुहास नितोरे यांना फोन करून सायंकाळी ४:४५ वाजण्याच्या सुमारास पत्नी काम करत असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी बोलावून घेतले.
हा खून केल्यानंतर संतोष हा रिक्षा घेऊन पत्नी काम करत असलेल्या हॉटेलवर आला. त्या ठिकाणी घडला प्रकार त्याने आपल्या पत्नीला सांगितला. पत्नीने घरी येऊन पाहिले असता या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली होती. त्यानंतर तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, तत्कालीन पोलिस निरीक्षक सुरेश कदम, तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस कर्मचारी चावरे, सुनील गायकवाड, अमित कदम, उमेश गायकवाड, प्रवीण पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
या प्रकरणी संतोष बबन सावंत याच्याविरोधात भारतीय दंड विधान कायदा कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावर अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने संतोष याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच १० हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास एक वर्षाचा साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून प्रफुल्ल रामचंद्र साळवी यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी म्हणून सहायक पाेलिस निरीक्षक सुनील आयरे यांनी मदत केली.