निरामय रुग्णालय तालुक्याची लाइफ लाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:23 AM2021-06-03T04:23:01+5:302021-06-03T04:23:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गुहागर : तालुक्यात एकही सर्व सुविधायुक्त रुग्णालय नसल्याने केवळ कोरोनातच नव्हे तर सगळ्याच आजारांमध्ये आरोग्य सुविधा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गुहागर : तालुक्यात एकही सर्व सुविधायुक्त रुग्णालय नसल्याने केवळ कोरोनातच नव्हे तर सगळ्याच आजारांमध्ये आरोग्य सुविधा न मिळाल्याने गेली अनेक वर्षे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाच्या निमित्ताने का होईना निरामय रुग्णालय सुरू झाले तर तालुक्यासाठी लाइफ लाइन ठरू शकते. तब्बल २० वर्षांनी सुरू होणारे हे रुग्णालय आता तरी नियमित सुरू राहावे, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.
एनरॉन कंपनी असताना सामाजिक बांधिलकी म्हणून वेगळा ट्रस्ट स्थापन करून त्या माध्यमातून निरामय रुग्णालय सुरू करण्यात आले. तीन ते चार वर्षे हे रुग्णालय सुरू होते. रुग्णालयाचा आर्थिक खर्च एनरॉन कंपनीतर्फे दाभोळ पाॅवर कंपनीच्या माध्यमातून केला जात होता. रुग्णालयाचे प्रत्यक्ष काम एका ट्रस्टच्या माध्यमातून हाताळले जात होते. मात्र, दुर्दैवाने प्रकल्प सुरू होताना प्राथमिक टप्प्यातच एनरॉन कंपनी बुडीत निघाली. कंपनीचे सर्व व्यवहार ठप्प झाले व त्यामुळे रुग्णालयाला होणारा आर्थिक पुरवठा बंद झाला. अखेर २००१ पासून हे रुग्णालय बंद झाले. यावेळी रुग्णालयातील महागडी आरोग्य सुविधा पुरवणारी यंत्रे येथून नेण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत रुग्णालय बंद अवस्थेत आहे.
२००१ ते २००५ या काळात एनरॉन कंपनीबरोबरच हे रुग्णालयही कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात होते. २००५ पासून केंद्र सरकारने हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याचे ठरविले. रत्नागिरी गॅस अँड पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट (आर. जी. पी. पी. एल.) असे नामकरण करून आज हा प्रकल्प सुरू आहे. नव्याने प्रकल्प सुरू होताना निरामय रुग्णालयही सुरू केले जाईल, असे तालुकावासीयांना वाटत होते. मात्र, प्रकल्प सुरू होऊन तब्बल पंधरा वर्षे होऊन गेली तरी निरामय रुग्णालय सुरू होण्याची केवळ प्रतीक्षाच राहिली.
काही सामाजिक कार्यकर्ते व संस्थांनी निरामय रुग्णालय सुरू होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर निवेदनाद्वारे मागणी केली होती. मात्र, याला कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. गुहागरचे आमदार भास्कर जाधव राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री असताना निरामय रुग्णालय सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात तसे होऊ शकले नाही. गतवर्षी कोरोना सुरू झाला असताना आरोग्य सुविधांची चणचण भासू लागली. अशावेळी निरामय सुरू व्हावे, अशी मागणी शिवतेज फाउंडेशनच्या माध्यमातून ॲड. संकेत साळवी यांनी मंत्री उदय सामंत यांच्याकडे पहिल्यांदा मागणी केली होती. या नंतरच्या काळात कोरोना कमी झाला व निरामय रुग्णालयाचा विषयही मागे पडला.
..........................
सगळ्या सुविधा लांबवर
गेली अनेक वर्षे तालुकावासीयांची आरोग्य सुविधांअभावी हेळसांड होत आहे. एखाद्या गंभीर रुग्णाला व्हेंटिलेटर, आयसीयूसारखी आरोग्यसुविधा आवश्यक असल्यास ४५ किलोमीटरवरच्या चिपळूणकडे किंवा साठ किलोमीटरवर असणाऱ्या डेरवण वालावलकर रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते. तेथे जाण्यासाठी किमान दीड ते दोन तास लागतात. यादरम्यान तत्काळ सुविधा न मिळाल्याने आजवर अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
....................
कोरोनाच्या निमित्ताने
आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना मंत्री उदय सामंत यांनी निरामय रुग्णालय सुरू झाल्यास तालुकावासीयांनाच नव्हे तर जिल्ह्यालाही याचा उपयोग होऊ शकतो, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत रुग्णालय इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीमध्ये करोडो रुपये खर्चून उभारलेली इमारत सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले.
...................
खर्चात कपात
कोरोना काळात नवीन आरोग्य सुविधा देताना मूलभूत खर्च वाढत आहेत. मात्र, येथे मोठी इमारत तयार आहे. त्यामुळे मनुष्यबळ व यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिल्यास निरामय रुग्णालय सुरू होऊ शकते. कोरोना काळात त्याचा उपयोग तर होईलच; पण पुढील काळात तालुक्याचा सुसज्ज रुग्णालयाचा अतिमहत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल व कायमस्वरूपी तालुकावासीयांना आपल्या हक्काचे रुग्णालय प्राप्त होईल. अनेकांसाठी हे रुग्णालय लाइफ लाइन ठरेल. त्यासाठी इमारतीचा खर्च करावा लागणार नाही.