लोटिस्मातील रूग्णसेवा ठरतेय जीवनदायी
By admin | Published: August 10, 2016 11:56 PM2016-08-10T23:56:10+5:302016-08-11T00:31:51+5:30
कौतुकास्पद उपक्रम : ब्राह्मण हितवर्धिनी सभेच्या माध्यमातून सेवा
दापोली : दापोली शहरातील फॅमिली माळ येथील लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथे गेली सुमारे १४ ते १५ वर्ष सुरू असणारी व कै. वसंतराव परांजपे यांच्या नावाने चालवली जाणारी रूग्णसेवा तालुक्यातील अनेक रूग्णांकरिता जीवनदायी ठरली आहे.
लोकमान्य टिळकांचे मूळ गाव दापोली तालुक्यातील चिखलगाव असून, त्यांच्या नावाने दापोली शहरात फॅमिली माळ येथे लोकमान्य टिळक स्मारक मंदिर आहे. तेथे दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभेच्या माध्यमातून दापोलीतील गरीब व खरोखर गरजू असणाऱ्या रूग्णांकरिता रूग्णसेवा चालवली जाते. दापोलीतील संघाचे जेष्ठ कार्यकर्ते कै. वसंतराव परांजपे म्हणजे व्हीडीपी यांनी त्यांच्या हयातीत याची संकल्पना मांडली. ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून अंमलात आणली. तेव्हापासून आज ही स्तुत्य सेवा सुमारे १५ वर्ष अव्याहतपणे सुरू आहे.
दरवर्षी यात मंडळाच्या कार्यकर्त्यांना वर्गणी काढून वस्तूंमध्ये भर टाकावी लागते. कारण एखादा रूग्ण बरा झाला तरी तो लगेच नेलेली वस्तू परत आणून देत नाही. तर काहीवेळा रूग्णांकडून नेलेल्या वस्तू खराबही होतात.
ही सेवा विनामूल्य असल्याने कोणाकडूनही एकही पैसा न स्वीकारता ही सेवा अव्याहतपणे सुरू आहे. यात वॉकर, वर-खाली होणारे पलंग, विविध प्रकारच्या काठ्या, वॉटर बेड, शौचालयाची विविध भांडी, शौचाला बसायच्या खुर्च्या, आदी विविध वस्तूंचे वाटप रुग्णांना करण्यात येते. यावर्षीही कार्यकर्ते यात वर्गणी काढून भर टाकणार आहेत.
वरील सर्व वस्तू रूग्णांना देताना मंडळाकडून कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यात येत नाही. येथे येणारा रूग्ण हा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे याची कधीही विचारणा करण्यात येत नाही. फक्त रुग्णाची गरज संपली की, वस्तू चांगल्या स्थितीत परत आणून देण्याच्या अटीवर ही लोकाभिमुख सेवा राबवली जात आहे. यामुळे दापोलीतील सर्व जाती-धर्माच्या गोरगरीब रूग्णांना याचा वर्षानुवर्षे लाभ मिळत आहे.
यासाठी मंडळाचे अध्यक्ष उदय गोविलकर, उपाध्यक्ष डॉ. विश्वनाथ जोशी, सचिव प्रदीप सोमण, सतीश जोशी, अभय कर्वे, रवींद्र पटवर्धन, प्रतिभा दांडेकर, वैभव जोशी, संजय बाळ, विवेक भावे, योगिनी देवधर, अॅड. केदार जोशी, सुधीर घांगुर्डे, अजित बेहेरे व इतर सदस्य परिश्रम घेतात. (प्रतिनिधी)
मंडळाचे विविध उपक्रम
या वर्षापासून मंडळ एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार आहे. तालुक्यात अस्तित्वात असणाऱ्या वसतिगृहांतील २ गरजू व हुशार विद्यार्थ्यांना मंडळाच्यावतीने शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याकरिता सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती मंडळाचे सचिव प्रदीप सोमण यांनी दिली. तसेच लोकमान्यांच्या पुण्यातिथीनिमित्त दरवर्षी लोकमान्य टिळक स्मारक येथे दोरीच्या उड्या व सूर्यनमस्कार यांच्या स्पर्धा घेतल्या जातात. यालादेखील दापोलीकरांचा उत्तम प्रतिसाद मिळतो.