निर्बंध उठवल्याने आंबा निर्यातीचा मार्ग झाला सोपा (संडे स्पेशल)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:32 AM2021-04-04T04:32:35+5:302021-04-04T04:32:35+5:30
कोकणच्या हापूसने मधूर स्वाद व अवीट गोडीने परदेशी नागरिकांनाही भुरळ घातली आहे. त्यामुळे हापूसला आता थेट मागणी ...
कोकणच्या हापूसने मधूर स्वाद व अवीट गोडीने परदेशी नागरिकांनाही भुरळ घातली आहे. त्यामुळे हापूसला आता थेट मागणी होऊ लागली आहे. फळमाशीचे कारण देत परदेशातील निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले होते. प्रत्येक देशाच्या नियमावलीनुसार बाष्पजल, उष्णजल, तसेच विकिरण प्रकिया करण्यात येते. बाष्प व विकिरण प्रक्रियेचा हापूसवर फारसा परिणाम होत नाही. हापूस आंब्याची साल पातळ असल्याने उष्णजल प्रक्रियेमुळे मात्र आंबा खराब होतो. त्यामुळे निर्यातीवरील निर्बंध हटविण्यात आले असल्याने परदेशी आंबा निर्यातीचा मार्ग सोपा झाला आहे. वाशी येथून युरोप व आखाती प्रदेशात आंबा निर्यात होत असताना, रत्नागिरीतूनही आंबा लंडन, कत्तार येथे निर्यात होत आहे. आतापर्यंत ७९२ डझन आंबा निर्यात झाला असून, ४०८ डझन आंब्यावर पणन विभागात प्रक्रिया सुरू असून येत्या चार दिवसांत लंडनकडे रवाना होणार आहे. दुबई येथून १६ टन आंब्याची मागणी असून, याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. दर्जेदार आंबा प्राप्त होताच निर्यात केली जाणार आहे.
निसर्गाच्या दृष्टचक्रातून वाचलेला आंबा बाजारात आला असून, वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविल्या जाणाऱ्या आंब्यापैकी ४० टक्के आंब्याची निर्यात आखाती व युरोपीय देशांत सुरू होती. रत्नागिरी येथील पणन विभागातर्फे आंब्यावरील प्रक्रिया केंद्रांची जबाबदारी सद्गुरू एंटरप्रायझेसकडे तीन वर्षांपूर्वी सुपूर्द करण्यात आली आहे. त्यानुसार सद्गुरू एंटरप्रायझेसकडून बागायतदारांशी थेट संपर्क साधून निवडक दर्जेदार आंबा निर्यात करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जाग्यावरच चांगले पैसे प्राप्त होत आहेत. तत्पूर्वी आंब्याचे ग्रेडिंग, वॉशिंग, ब्रशिंग, ड्राॅईंग करून तो योग्य पद्धतीने पॅकिंग करून वातानुकूलित व्हॅनने मुंबईतील विमानतळावर पाठविण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईतून हवाई सेवेद्वारे लंडन, कतारकडे आंबा निर्यात करण्यात आला आहे. कतारसाठी ४२६ डझन, तर लंडनसाठी ३६६ डझन आंबा निर्यात करण्यात आला आहे. पणन विभागाच्या प्रक्रिया केंद्रात लंडनसाठी ४०८ डझन आंबा दाखल झाला असून, दि. ८ एप्रिलपर्यंत हा आंबा लंडनला निर्यात होणार आहे. यापूर्वी कतार व लंडन या देशांत आंबा निर्यात करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील प्रसन्न पेठे, आनंद मराठे, दत्तात्रय तांबे या तीन बागायतदारांकडील ७९२ डझन आंबा निवडण्यात आला होता. दुसऱ्या कन्साईंटमेंटसाठी ४०८ डझन आंबा दत्तात्रय तांबे यांच्याकडचा असून, त्यावर प्रक्रिया सुरू आहे. ७५० ते ८०० रुपये डझन दराने आंब्याला दर प्राप्त होत आहे. लंडनसाठी २०० ते २३० ग्रॅमच्या वजनाचा, तर कतारसाठी २३० ते २७० ग्रॅम वजनाच्या आंब्याची निवड करण्यात येत आहे.
उत्पादन कमी असल्याने निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात आंबा उपलब्ध होत नाही. मात्र, वाशी तसेच स्थानिक बाजारपेठेतील दरही गडगडले असल्याने बागायतदार आंबा निर्यातीसाठी तयार झाले आहेत. दुसऱ्या कन्साईंटमेंटसाठी लंडनकरिता ४०८ डझन आंब्याची उपलब्धता झाली आहे. दुबईतून आणखी १६ टन आंब्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. दुबईसाठी २३० ते २७० ग्रॅम आंबा अपेक्षित आहे. निवडक आंबा आवश्यक असल्याने आंब्याची उपलब्धता झाल्यानंतरच निर्यात केली जाणार आहे. हवाईमार्गेच आंब्याची निर्यात सुरू आहे. मात्र, वाशी येथून दररोज युरोपीय व आखाती प्रदेशात निर्यात सुरू आहे.
गतवर्षी कोरोना काळात दि. १ एप्रिलपासून आंबा निर्यात सुरू झाली होती. यावर्षी मार्चमध्येच आंबा निर्यात सुरू झाली आहे. गतवर्षी ८६४० मेट्रिक टन आंबा निर्यात झाला होता. त्यामध्ये हापूसचे प्रमाण अधिक आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट व मुंबईचे विमानतळ निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत असून, परदेशात आंबा निर्यातीसाठी समुद्रमार्गे व हवाई मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे. हवाई मार्गाचा दर अधिक असल्याने समुद्रमार्गे निर्यात परवडत आहे. वास्तविक एप्रिलपासूनच आंबा निर्यात सुरू होते, मात्र यावर्षी उत्पादन कमी असतानासुध्दा निर्यात सुरू झाली आहे. वाशी येथून निर्यात होत असतानाच आता जिल्ह्यातून निर्यात सुरू झाली आहे. मुंबई, अहमदाबाद, सुरत येथील बाजारपेठेपेक्षा परदेशातील निर्यातीद्वारे चांगले अर्थार्जन प्राप्त होत आहे.
प्रमाणपत्र आवश्यक
परदेशी आंबा निर्यात करणाऱ्या बागायतदारांकडे मँगोनेट प्रमाणपत्र व भौगोलिक निर्देशांक नोंदणी आवश्यक आहे. वाशी किंवा अन्य बाजारपेठेत आंबा पाठविताना चार, पाच, सहा डझनाची वर्गवारी करून आंबा पेटीत भरून पाठविला जातो. मात्र, निर्यातीसाठी फळाचे वजन करूनच आंबा निवडला जातो. डागविरहित आंबा गरजेचा असून, कीटकनाशकांच्या फवारणीबाबतची नोंदणी गरजेची आहे. त्यामुळे परदेशात निर्यातीपेक्षा मुंबई व अन्य बाजारपेठेवर बागायतदार अवलंबून राहत आहेत.
परदेशात मागणी
मुंबई येथून बहारिन, कुवेत, ओमान, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, इंग्लंड या देशात आंबा निर्यात सुरू आहे. २०१९ मध्ये २२ हजार ८९२ मेट्रिक टन आंबा निर्यात करण्यात आला होता, तर २०२० मध्ये ११७६० मेट्रिक टन आंबा निर्यात झाला होता. गतवर्षी कोरोनाचे संकट असतानासुध्दा चांगला आंबा निर्यात झाल्याने शेतकऱ्यांना चांगले अर्थार्जन प्राप्त झाले होते. वास्तविक दरवर्षी एप्रिलपासून निर्यात सुरू होत असली तरी यावर्षी मार्चपासून निर्यातीस प्रारंभ झाला आहे. मात्र, एकूणच उत्पादन कमी असल्याने गतवर्षीचे निर्यातीचे उद्दिष्ट गाठणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातच प्रक्रिया
वाशी तथा अन्य बाजारपेठेवर अवलंबून असणाऱ्या कोकणातील शेतकऱ्यांना आंबा निर्यात करून चांगले पैसे मिळवून देण्यासाठी गेली तीन वर्षे सद्गुरू एंटरप्रायझेस निर्यातीसाठी सक्रिय आहे. अपेडा मान्यता प्रमाणपत्र एंटरप्रायझेसने घेतले असून, पणन मंडळाच्या प्रक्रिया केंद्रामध्ये आंब्यावर प्रक्रिया करून विक्रीसाठी पाठविण्यात येत आहेत. यावर्षी उत्पादन कमी असल्याने कोकणचा आंबा परदेशातील ग्राहकांपर्यंत पोहोचविताना, शेतकऱ्यांना चांगला दर मिळवून दिला जात आहे.
दराबाबत जागृत
खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत प्रचंड खर्च होतो. कीटकनाशकांचे वाढते दर यामुळे शेतकरी दराबद्दल जागृत झाले आहेत. त्यामुळे वाशीसह सुरत, अहमदाबाद बाजारपेठेतील दर तसेच निर्यातीसाठी उपलब्ध होणारे दर याची तुलना करून आंबा विक्रीसाठी कुठे पाठवावा, याचा निर्णय घेण्यात येतो. गतवर्षीपासून खासगी विक्रेते आंबा खरेदीसाठी शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा पाठविताना दलालीची आकारणी रद्द करण्यात आली असल्याने हमाली, वाहतूक खर्च या सर्वांची आकडेमोड करून आंबा विक्रीबाबत निर्णय घेतला जात आहे.