कमळ हसले; धनुष्यबाण हिरमुसला

By admin | Published: May 19, 2016 11:46 PM2016-05-19T23:46:13+5:302016-05-19T23:55:44+5:30

रत्नागिरी नगरपरिषद : नगराध्यक्षांनी केले सभागृह ‘सील’, पाणी योजनेच्या सादरीकरणाचा बार फुसका

Lily laugh; Archery Hiramusa | कमळ हसले; धनुष्यबाण हिरमुसला

कमळ हसले; धनुष्यबाण हिरमुसला

Next

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या संत गाडगेबाबा सभागृहातच वाढीव पाणीपुरवठा योजनेचे ‘पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन’ घेण्याचा शिवसेनेचा बार आज गुरुवारी फुसका ठरला. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी पालिका सभागृह चक्क ‘सील’ केल्याने सेनेची कोंडी झाली. परिणामी तलवार म्यान करण्याची नामुष्की शिवसेनेवर आली. या योजनेचे ‘पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन’ न होता मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नुसतेच सादरीकरण झाले. त्यामुळे पालिकेत ‘कमळ खुलले, धनुष्यबाण हिरमुसला’ अशी चर्चा सुरू होती.
गेल्या आठवडाभरापासून रत्नागिरी शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेवरून नगराध्यक्ष महेंद्र मयेकर व आमदार उदय सामंत तसेच सेना नगरसेवक यांच्यामध्ये रणकंदन माजले होते. शासन व जिल्हा नियोजन मंडळाने रत्नागिरी शहराला दिलेला निधी योग्यप्रकारे खर्ची पडला की नाही, याची माहिती घेण्यासाठी आमदार उदय सामंत यांनी नगरपरिषदेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
त्यावेळी वाढीव पाणी योजनेचा प्रस्ताव नगरपरिषदेने सादर केल्याची माहिती त्यांना मिळाली. ही योजना लवकरात लवकर व्हावी, यासाठी पालिकेला आपणही सहकार्य करू, अशी भूमिका आमदार सामंत यांनी घेतली. त्यासाठी जीवन प्राधिकरणकडून सर्वांसाठी माहिती व्हावी म्हणून १९ मे रोजी पालिकेच्या सभागृहात योजनेचे सादरीकरण करण्याचा निर्णय सामंत यांनी घेतला. मात्र, आमदार सामंत हे या प्रकरणात श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी प्रसारमाध्यमांकडे केला होता.
या विषयाबाबत सातत्याने आरोप - प्रत्यारोप सुरू होते. त्यातूनच नगरपरिषदेच्या सभागृहात हे सादरीकरण करता येणार नाही, असे पालिकेने सामंत यांना कळविले. त्यावरून सभागृहातच हे सादरीकरण करणार, असे सेना नगरसेवकांनी नगराध्यक्षांना ठणकावले. त्यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी उपस्थित राहणार असल्याचेही जाहीर झाले. त्यामुळे १९ मे रोजी पालिकेत राजकीय राडा होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.
आज गुरुवारी पालिकेच्या आवारात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळी १०.३० वाजता सेनेचे खासदार राऊत, आमदार सामंत, साळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, उपनगराध्यक्ष भय्या मलुष्टे, पक्षप्रतोद बंड्या साळवी यांच्यासह सेनेचे नगरसेवक, जीवन प्राधिकरणचे अधिकारी मुल्ला हे पालिकेत आले. संत गाडगेबाबा सभागृह आधीच सीलबंद केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे खासदार राऊत यांनी संयमी भूमिका घेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात सादरीकरण करण्यास सांगितले.
शहरात झालेल्या ‘वॉटर आॅडिट’नुसार २९८ नळजोडण्या अनधिकृत असल्याचे या सादरीकरणात सांगण्यात आले. तसेच वितरण व्यवस्थेत ४२ टक्के गळतीचे प्रमाण आहे. २१ दशलक्ष लीटर पाण्याची योजना आहे. वितरण व्यवस्था बदलण्यासाठी ८ कोटींचा खर्च येणार आहे. पूर्ण योजना ही ६८.४० कोटींची आहे.
यावर सर्व त्रुटी दूर करूनच हा प्रस्ताव राज्याच्या सुकाणू समितीकडे तांत्रिक मंजुरीसाठी पाठवावा, अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली. तासाभराच्या चर्चेनंतर प्रेझेंटेशन संपले. (प्रतिनिधी)

शांततेत सादरीकरण : ...तर दरोड्याचा गुन्हा
शिवसेनेच्या राजकीय खेळीला मात देण्यासाठी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर गटाकडूनही जोरदार तयारी करण्यात आली होती. त्यानुसार पालिका सभागृह नुसतीच कडी लावून ठेवावे, असे प्रथम ठरले होते. नंतर मात्र सभागृह ‘सील’ केले गेले. सील तोडून प्रवेश केला गेला असता तर तो दरोड्याचा गुन्हा ठरला असता. मात्र, खासदार राऊत यांनी संभाव्य घटनांचा अंदाज घेत सभागृहापासून दूर जाणेच पसंत केले. त्यामुळेच पालिकेत हे सादरीकरण शांततेत झाले.

निवडणुका होण्याआधी योजना अशक्यच
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून वाढीव पाणी योजनेच्या तांत्रिक मंजुरीलाच दोन ते तीन महिने जातील. प्रस्ताव सादरीकरणानंतर त्रुटी दूर करून सुकाणू समिती मंजुरी देईपर्यंत आणखी महिने जातील. त्यामुळे निवडणुकीपूर्वी ही योजना पूर्णत्त्वास जाऊ शकत नाही, हेसुध्दा स्पष्ट झाले.

Web Title: Lily laugh; Archery Hiramusa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.