खेडमध्ये जंगलात दारुअड्ड्यावर छापे, चाैघांना अटक; साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
By अरुण आडिवरेकर | Published: July 6, 2023 02:20 PM2023-07-06T14:20:42+5:302023-07-06T14:29:09+5:30
खेड : दारुबंदी विराेधक माेहिमेंतर्गत खेड पाेलिसांनी जंगलमय भागात हातभट्टी दारू धंद्यावर बुधवारी (५ जुलै) सकाळी ७ वाजता छापा ...
खेड : दारुबंदी विराेधक माेहिमेंतर्गत खेड पाेलिसांनी जंगलमय भागात हातभट्टी दारू धंद्यावर बुधवारी (५ जुलै) सकाळी ७ वाजता छापा टाकला. या छाप्यात एकूण चार जणांना अटक केली आहे. तसेच ६,६०,८७० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या छाप्यात एका ठिकाणी बेवारस हातभट्टी पाेलिसांना आढळली.
मंगेश दगडू निकम, सुरेश रुमाजी निकम, संतोष जयराम निकम, अशोक लक्ष्मण निकम (सर्व रा. खेड) अशी अटक केलेल्या चाैघांची नावे आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी जिल्ह्यात कोठेही अवैध दारूधंदे सुरू राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. तसेच गुन्हे प्रतिबंध, गुन्हे तपास आणि अवैध धंद्याविरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांना बक्षीस योजना सुरू केली आहे.
खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुनगेकर यांना खेड पोलिस स्थानक हद्दीमध्ये काही ठिकाणी हातभट्टी दारूधंदे सुरू असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने मौजे कुळवंडी, देऊळवाडी, खेड आणि आजूबाजूला असणाऱ्या १ किमीच्या जंगलमय व डोंगर भागांमध्ये ओढ्या जवळ असणाऱ्या हातभट्टी दारूधंद्यावर धडक कारवाई केली. पाेलिसांनी बेवारस स्थितीत मिळून आलेल्या हातभट्टीसाठी लागणारा दारुसाठीचा गूळ, नवसागर, हातभट्टी दारू असा एकूण ६,६०,८७० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुनगेकर, पोलीस निरीक्षक नितीन भोयर, पाेलिस उपनिरीक्षक सुजित सोनवणे, पाेलिस हेडकाॅन्स्टेबल दीपक गोरे, महेंद्र केतकर, दिनेश कोटकर, विक्रम बुरोंडकर, पाेलिस काॅन्स्टेबल विनय पाटील, रमेश बांगर, रुपेश जोगी, अजय कडू, राहुल कोरे, कृष्णा बांगर व महिला पाेलिस काॅन्स्टेबर लतिका मोरे यांनी केली.