घर सुनेसुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:39 AM2021-09-16T04:39:17+5:302021-09-16T04:39:17+5:30
मंडणगड : कोकणातील आवडते दैवत असलेल्या गणेशाचा उत्सव संपत आला आहे. काही भक्तांच्या घरातील गणेशाचे पाच दिवसानंतर विसर्जन झाले ...
मंडणगड : कोकणातील आवडते दैवत असलेल्या गणेशाचा उत्सव संपत आला आहे. काही भक्तांच्या घरातील गणेशाचे पाच दिवसानंतर विसर्जन झाले आहे. त्यामुळे गजबजलेले घर आता शांत झाल्याने भक्तांना बाप्पाचा विरह असह्य होऊ लागला आहे. घरातील गजबजाट आता हळुहळू कमी होऊ लागला आहे.
उनाड जनावरांचा वावर
खेड : सध्या शहरात अन्य समस्यांबरोबरच उनाड जनावरांची समस्या कायम आहे. शहरातील मुख्य रस्ते अंतर्गत रस्त्यांसह, उद्याने, मच्छी मार्केट आदी कामे अपूर्ण असतानाच आता उनाड जनावरांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. भररस्त्यात झुंडीने वावरणाऱ्या या जनावरांमुळे वयोवृद्ध स्त्रिया, मुले यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
कार्यकर्ता मेळावा
दापोली : बहुजन समाज पार्टी दापोली विधानसभा क्षेत्रातर्फे १६ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील पेन्शनर्स हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
उद्योजकता प्रशिक्षण
चिपळूण : भारतीय उद्योजकता विकास संस्था, अहमदाबाद आणि टाटा कम्युनिकेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळुणातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चिपळूण, सावर्डे, पिंपळी खुर्द येथे या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमातून मुलाखतीद्वारे प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे.
कला दालनाचे उद्घाटन
गुहागर : तालुक्यातील पालशेत येथे श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रज्वल गुहागरकर कला दालनाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा शुक्रवार, १७ सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे. सकाळी १०.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सदस्य प्रशांत पालशेतकर हे असणार आहेत.
गाड्यांचे निर्जंतुकीकरण
गुहागर : शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या विरार मनवेलपाडा येथील गुहागर प्रतिष्ठानतर्फे गाड्यांचे निर्जंतुकीकरण हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात विरारहून गावाकडे येणाऱ्या राज्य परिवहनच्या गाड्यांचे निर्जंतुकीकरण करण्याचा उपक्रम या संस्थेने हाती घेतला आहे.
घाणेकर यांची निवड
खेड : तालुक्यातील हेदली गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी राजू बळवंत घाणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. घाणेकर सलग ९ वर्षे बिनविरोध अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. २००९ साली त्यांनी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतच राज्य शासनाचा ‘तंटामुक्त गाव’ हा पुरस्कार हेदलीला मिळवून दिला आहे. त्यांचे निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.
झाडांची लागवड
चिपळूण : येथील नगर परिषदेच्या उद्यान विभागाकडून शहरात यावर्षी १,९०० झाडे लावण्यात येणार आहेत. या कामासाठी सामाजिक संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून दरवर्षीच हा उपक्रम हाती घेण्यात येतो. गतवर्षी कोरोना काळातही सर्वतोपरी काळजी घेत १,७९८ झाडे शहरात लावण्यात आली होती.
रस्त्याची दुर्दशा
शिरगाव : चिपळूण तालुक्यातील शिरगाव ते पोफळी दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. शिरगाव बाजारपेठेतील रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. बौद्धवाडीतील ब्रिटीशकालीन पूलही नादुरुस्त झाल्याने त्यावरील वाहतूक बंद आहे. त्यामुळे सध्या नवीन पुलावरुन वाहतूक सुरु आहे. परंतु, हा रस्ताही उखडला आहे.
आरत्यांचे सूर थांबले
लांजा : तालुक्यातील बहुतांशी भागातील पाच दिवसांच्या गणरायांचे मंगळवारी विसर्जन झाले आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत घरोघरी सकाळी आणि रात्री दोन्हीवेळा आरत्या, भजने यांचे सूर ऐकू येत असत. मात्र आता गणरायांचे विसर्जन झाले आहे. त्यामुळे घरोघरी ऐकू येणारे आरती आणि भजनांचे सूर आता थांबले आहेत.