ऐकावे नेत्यांचे की करावे मनाचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:18+5:302021-06-16T04:42:18+5:30
उदय सामंत व्यापाऱ्यांच्या पाठीशी, तर भास्कर जाधव वाईटपणा घेण्यास तयार लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ...
उदय सामंत व्यापाऱ्यांच्या पाठीशी, तर भास्कर जाधव वाईटपणा घेण्यास तयार
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आलेली नसून, परिस्थिती हाताबाहेर जात आहे, तशी नेत्यांमधील मतमतांतरे व्यक्त होऊ लागली आहेत. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या सूचना येऊ लागल्याने प्रशासनामध्येच संभ्रम निर्माण झाला आहे. आता नेत्यांचे ऐकावे की मनाचे करावे, अशी द्विधा मनस्थिती काही अधिकाऱ्यांची झाली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी येथील पंचायत समितीत आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, अत्यावश्यक सेवेत नवीन ३२ वस्तू व सेवांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे अनेक दुकाने सुरू राहण्यास मदत होईल. गेले दीड वर्ष बहुतांश दुकाने बंद राहिल्याने व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चाही झालेली आहे. व्यापाऱ्यांच्या बहुतांशी मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे स्पष्ट केले होते.
त्यापाठोपाठ आमदार भास्कर जाधव यांनी सोमवारी तातडीची आढावा बैठक त्याच सभागृहात घेतली. जाधव म्हणाले की, ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून, प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत आपले नियंत्रण सैल करु नये. एवढेच नव्हे तर एकवेळ गावात वाईटपणा घेण्यास कोणी तयार नसेल, तर वाईटपणा घेण्याची आपली तयारी आहे. पण काहीही करून कोरोनाची ही साखळी तोडायलाच हवी, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. तेव्हा ही साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. जिथे आवश्यकता आहे तेथे कडक लॉकडाऊन करा, असे आवाहन जाधव यांनी केले.
--------------------------------
ग्राम कृती दलाची जबाबदारी तंटामुक्त अध्यक्षांकडे
ग्रामीण भागातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ग्राम कृती दलाची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचा सूर या आढावा बैठकीत उमटला. मात्र, समितीचा अध्यक्ष कोण, यावरून काही गावांमध्ये राजकारण शिजत असल्याचे पुढे आले. त्यामुळे ही जबाबदारी सरपंचांऐवजी तंटामुक्त अध्यक्षांवर सोपविण्यात यावी, असे जाधव यांनी स्पष्ट केले. मात्र, याआधी सरपंच या समितीचा अध्यक्ष व अन्य काही बदल केले आहेत. त्यामुळे यावरूनही काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.
---------------------------------
ही तर नामुष्की
आज देशात कोरोनामुळे मृत्यूंचे प्रमाण अधिक असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र क्रमांक एकवर असून, त्यामध्ये सर्वात स्वच्छ जिल्हा म्हणून ओळख असलेल्या राज्यात रत्नागिरी दोन क्रमांकावर आहे. ही अत्यंत नामुष्कीची गोष्ट असून, यातून बाहेर पडायचे असेल तर ती वेळ आताच आहे. अन्यथा भविष्यात आणखी गंभीर परिस्थितीला समोर जावे लागेल, असे आमदार भास्कर जाधव यांनी या आढावा बैठकीत स्पष्ट केले.