थोडी राजकीय हलचल -
By admin | Published: June 17, 2016 09:58 PM2016-06-17T21:58:25+5:302016-06-17T23:34:47+5:30
कोकण किनारा... रत्नागिरी
दोन कदमांमधील संघर्ष आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना पुन्हा एकदा बसलेला धक्का! यामुळे जिल्ह्यात थोडी का होर्ईना राजकीय हलचल निर्माण झाली आहे. आणखी सहा महिन्यांनी नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत, त्यानंतर दोन महिन्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या. पण तरीही रत्नागिरी जिल्हा मात्र राजकीयदृष्ट्या निद्रिस्तच आहे. त्यात आता आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय क्षेत्राला थोडी जाग आली आहे. ही जाग आगामी दोन निवडणुकांपर्यंत टिकेल, अशी आशा आहे. कारण तसं झालं तरच लोकांसाठी काहीतरी करायची स्पर्धा लागेल.
रोज काही ना काही घडामोडी घडताहेत, असे चित्र रत्नागिरी जिल्ह्यात कधीच दिसत नाही. त्यात राजकीय क्षेत्र तर पूर्णपणेच शांत आहे. एकमेकांवर कुरघोड्या, आरोप - प्रत्यारोप केले जात नाहीत, ही बाब उत्तम. पण अशा टीकेखेरीज प्रगतीही होत नाही. कोणीतरी चुका दाखवल्याशिवाय सुधारणाही होत नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात राजकीय वातावरण सतत जागे असल्यानेच तिथे विकासाच्या नव्यानव्या गोष्टी घडतात. स्वत:ला सत्तेत किंबहुना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी राजकीय लोक सातत्याने काही ना काही उपक्रम राबवतच असतात. रत्नागिरी जिल्ह्यात मात्र या साऱ्याची वानवा आहे. दुसरा पुढे जाईल म्हणून तरी आपण काहीतरी करायला हवे, अशी मानसिकता इथल्या राजकीय लोकांमध्ये दिसत नाही. या नकारात्मकतेमुळेच रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षात नवीन प्रकल्प आलेला नाही, उद्योग उभे राहिलेले नाहीत किंवा रोजगार निर्माण करतील, अशा कुठल्याच योजना राबवण्यात आलेल्या नाहीत.
गेले काही दिवस राजकीय क्षेत्रात मात्र थोडी हलचल सुरू झाली आहे. ही हलचल सध्या तरी त्या-त्या पक्षांपुरती किंवा राजकीय क्षेत्रापुरती मर्यादीत आहे. त्याचा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर कोणताच परिणाम होणार नाही. पण निद्रिस्त किंबहुना निपचित पडलेल्या रत्नागिरीतील राजकारणात ही हलचल दिसली, हेही नसे थोडके.
सध्याचे राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेनेतील ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि एकेकाळी त्यांचेच चेले म्हणून प्रसिद्ध असलेले व सध्या स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण केलेले दापोली - गुहागर - खेडचे आमदार संजय कदम यांच्यामध्ये शाब्दिक वादवादी जोरदार रंगली. आपण आणि सूर्यकांत दळवी यांच्यातील वादामुळे दापोली मतदारसंघ संजय कदम यांच्याकडे गेला, अशी कबुली देतानाच रामदास कदम यांनी संजय कदम यांना पराभूत करण्याची गर्जना केली. त्याला संजय कदम यांनी उत्तर दिले. त्यावर परत रामदास कदम आणि परत संजय कदम असे आरोप-प्रत्यारोप होत राहिले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्साहात आले आहेत. आता नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणुकीत या उत्साहाची झलक पाहायला मिळेल.
रत्नागिरी शहराला लागूनच असलेली मोठी ग्रामपंचायत म्हणजे नाचणे. येथे उपसरपंच पदासाठी पक्षाने आमदार उदय सामंत यांच्यासमवेत शिवसेनेत दाखल झालेले भय्या भोंगले यांची निवड केली होती. प्रत्यक्षात शिवसेना सदस्यांनी कपील सुपल यांना निवडून दिले. या जागेवर भोंगले यांना बसवण्यासाठी पक्षाकडून सुपल यांना राजीनामा देण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार सुपल यांनी राजीनामा दिला. मात्र, परत झालेल्या निवडणुकीत शिवसेना सदस्यांनी सुपल यांचीच निवड केली. या प्रकारामुळे शिवसेनेत हलचल उडाली आहे. आमदार सामंतसमर्थक भोंगले यांना डावलण्यात आल्याची वृत्ते सर्वत्र झळकली. त्यावर सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘समर्थक’ या शब्दावर आक्षेप घेतला. शिवसेनेत कोणी समर्थक नाहीत, सर्व शिवसैनिक आहेत, असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण राजकारणात असे होत नाही. एखाद्या नेत्याच्या पक्षांतरात जे कार्यकर्ते त्यांच्यासोबत पक्षांतर करतात, त्यांना समर्थक अशीच ओळख मिळते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाला ११ वर्षे झाली. त्यांच्यासोबतचे काहीजण परतही गेले. पण, त्यांची राणेसमर्थक ही ओळख अजून कायम आहे.
सद्यस्थितीत या दोन घटनांनी राजकारणात चर्चेचे विषय झाले आहेत. आता नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे या आरोप-प्रत्यारोपांमुळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील, हे नक्की.