रत्नागिरीतील प्राणीमित्रांकडून बैलाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:16 AM2019-12-24T11:16:18+5:302019-12-24T11:16:54+5:30
रस्त्याच्या पलिकडे वाहणाऱ्या पऱ्यामध्ये बैल पडल्याचा संदेश सोशल मीडियावर पडताच काही तासातच प्राणीमित्रांनी त्याची सुटका केल्याचा प्रकार रत्नागिरीत सोमवारी सकाळी घडला. शहरातील जिल्हा शासकीय रूग्णालयासमोरील रस्त्याच्या पलिकडे पडलेल्या या बैलाला प्राणीमित्रांनी जणू जीवदानच दिले.
रत्नागिरी : रस्त्याच्या पलिकडे वाहणाऱ्या पऱ्यामध्ये बैल पडल्याचा संदेश सोशल मीडियावर पडताच काही तासातच प्राणीमित्रांनी त्याची सुटका केल्याचा प्रकार रत्नागिरीत सोमवारी सकाळी घडला. शहरातील जिल्हा शासकीय रूग्णालयासमोरील रस्त्याच्या पलिकडे पडलेल्या या बैलाला प्राणीमित्रांनी जणू जीवदानच दिले.
कठडा नसलेल्या पऱ्यामध्ये सोमवारी सकाळी बैल पडला होता. वजनाने अधिक असलेल्या बैलाचे पोट फुगले होते. त्यामुळे त्याला बाहेर काढणे मुश्किल होते. त्याचवेळी राजापूर येथील बेंद्रे यांनी त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बैल उठू शकत नव्हता.
या घटनेची माहिती व्हॉट्सअॅप ग्रुपवरून फिरू लागताच त्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी तेथे दाखल झाले. बैलाला बाहेर काढण्यासाठी नगर परिषदेचे कांबळे यांनी जेसीबी मागवला. या प्रकाराची माहिती प्राणीमित्र मुकेश गुंदेचा यांना मिळाली.
ते सहकाऱ्यांसह तेथे आले असता त्यांनी बैलाची पाहणी केली. त्याला आकडी आली असावी, हे त्यांच्या लक्षात आले. नगरपरिषदेचा जेसीबी आल्यानंतर त्या बैलाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तेथे आलेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत यांनी बैलाला इंजेक्शन दिले.
नगर परिषदेच्या बेपर्वाईमुळे बैल पडला
रत्नागिरी शहरातील अनेक ठिकाणी पऱ्या बंदिस्त करण्यात आलेले नाहीत. पऱ्याशेजारी कठडा नसल्याने कोणीही खाली पडण्याची शक्यता आहे. अंधारात या भागाचा अंदाज येत नाही. संरक्षक कठडा नसल्यानेच हा बैल खाली पडला. काही ठिकाणी गटारेदेखील उघडी असल्याचे दिसत आहे.