कर्ज सुरक्षित असून ईडीकडे सर्व माहिती सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:23 AM2021-07-18T04:23:12+5:302021-07-18T04:23:12+5:30
रत्नागिरी : जरंडेश्वर साखर कारखान्याला नव्हे तर जरंडेश्वर सहकारी शुगर मिल्स प्रा. लि. कंपनीला मंजूर केलेल्या २५ कोटी ...
रत्नागिरी : जरंडेश्वर साखर कारखान्याला नव्हे तर जरंडेश्वर सहकारी शुगर मिल्स प्रा. लि. कंपनीला मंजूर केलेल्या २५ कोटी रुपयांच्या कर्जापैकी ८ कोटी ७५ लाख रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे. हा कर्जपुरवठा नियमांचे पालन करुनच करण्यात आला आहे. यासंदर्भात मागविण्यात आलेली सर्व माहिती ईडीकडे सादर करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. तानाजी चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरीतील बँकेच्या मुख्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चोरगे म्हणाले, जरंडेश्वर साखर कारखान्याच्या व्यवहारांची ईडीकडून तपासणी करण्यात येत आहे. ईडीच्या पत्रानुसार कर्ज कोणत्या प्रकारचे दिले आहे. कर्ज प्रकरण मंजुरीची पध्दत, कर्जतारणविषयी माहिती, कर्ज वितरणाचा कालावधी, कर्ज वितरण कोणत्या पध्दतीने केले, जरंडेश्वर कंपनीचे प्रमुख आणि इतर काही माहिती ईडीने मागवली होती. ही सर्व माहिती ईडीला सादर करण्यात आली आहे, असे डॉ. चोरगे यांनी सांगितले.
चोरगे म्हणाले की, जरंडेश्वर सहकारी शुगर मिल्स प्रा. लि. कंपनीने जरंडेश्वर साखर कारखाना चालविण्यासाठी घेतला आहे. शुगर मिल्स कंपनीने उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी लीड बँकेसह पुणे, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून २५९ कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. एकूण ५ बँकांनी एकत्रित येऊन हे कर्ज मंजूर केलेल्या १६७ कोटी रुपयांपैकी ५८ कोटी रुपये जून महिन्यात वितरित करण्यात आले. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा बँकेने ८ कोटी ७५ लाख रुपये कर्ज १२ टक्के व्याजाने दिले आहेत. हे कर्ज देताना सुरक्षितता पाहूनच ते देण्यात आलेले आहे. या कर्जापोटी पुणे बँकेकडे ४२५ कोटी रुपयांची मालमत्ता तारण ठेवण्यात आलेली आहे. या कर्जापोटी व्याजाची रक्कम पहिला हप्ता जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जमा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांनाही कर्ज नाकारले
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तीनवेळा कर्ज देण्यास सांगितले होते. मात्र, बँकेकडे तेवढी रक्कम नसल्याने उपमुख्यमंत्री पवार यांनाही कर्जासाठी नकार दिला होता. पंढरपूरचे माजी आमदार भरत भावगे यांनीही कारखान्यासाठी कर्जाची मागणी केली होती. त्यांनाही कर्जासाठी नाही म्हटले होते, अशी माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन तानाजी चोरगे यांनी दिली.