स्थानिक जनतेच्या वेदना, समस्या समोर येणे गरजेचे : संजय आवटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:33 AM2021-09-25T04:33:28+5:302021-09-25T04:33:28+5:30
असगोली : जग, देश स्तरावरील माहिती प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे समजते. पण स्थानिक जनतेच्या वेदना, विवंचना, समस्या, समोर येणे ...
असगोली : जग, देश स्तरावरील माहिती प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे समजते. पण स्थानिक जनतेच्या वेदना, विवंचना, समस्या, समोर येणे ही गरज आहे. त्यातून हायपर लोकल ही संकल्पना उदयाला येत आहे. प्रशिक्षणानंतर स्वत:चे माध्यम उभे करून स्थानिक विषयांमध्ये प्रभावी भूमिका घेण्याची संधी आहे, असे प्रतिपादन पत्रकार संजय आवटे यांनी केले. ते पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
गुहागरमधील खरे ढेरे भोसले महाविद्यालयात पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू झाला आहे. त्याचे उद्घाटन संजय आवटे यांनी ऑनलाइन पद्धतीने केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विराज महाजन यांनी केले. मनोगतामध्ये प्राचार्य अनिल सावंत यांनी वर्तमानपत्रांचा इतिहास, टीव्हीचा जन्म यासंबंधीची माहिती दिली.
संजय आवटे पुढे म्हणाले की, गुहागरसारख्या तालुक्यात माध्यमांविषयी आकलन होण्यासाठी, समज येण्यासाठी अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करणे ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
पूर्वी वर्तमानपत्रात आल्यानंतरच घटना जगाच्या कानाकोपऱ्यात पसरायची. आता घटना घडताना समजते. जागतिकीकरणानंतरच्या नव्या जगात माध्यमांची क्रांती झाली. सर्व माध्यमे मोबाइलमुळे हातात आली. कोरोनाच्या काळात डिजिटल माध्यमांना अधिक महत्त्व प्राप्त झाले. ही सगळी माध्यमे एकमेकांचा हात हातात घेऊन चालली आहेत. वृत्तवाहिन्या कोणत्या वर्तमानपत्रात काय आहे हे सांगताना दिसतात. डिजिटल माध्यमांमुळे जगातील घटना सर्वसामान्य माणसापर्यंत तत्क्षणी पोहोचतात. तरीही विश्वासार्हतेसाठी वर्तमानपत्राकडे पाहिले जाते. प्रत्येकाने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. तरच कोणत्याही माध्यमात यश मिळेल. हायपर लोकल ही सर्वांसाठी संधी आहे. प्रत्येक वेळी वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी यांच्यामध्ये संधी मिळेल याची वाट न पाहता, स्थानिक समस्या, वेदना, सुखद घटना यांना स्थान असलेले माध्यम आपण तयार करावे, असे त्यांनी सांगितले.
या ऑनलाइन उद्घाटन सत्राला खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल सावंत, प्रा. विराज महाजन, प्रा. पद्मनाभ सरपोतदार, प्रा. गोविंद सानप, मनोज बावधनकर, मयूरेश पाटणकर, गणेश धनावडे उपस्थित होते.
-----------------------
समग्र जगाचं आकलन वर्तमानपत्रात
भारत हा जगातला एकमेव देश आहे जेथे निर्मिती खर्चापेक्षा कमी किमतीत वर्तमानपत्र घरात वाचायला मिळते. आपल्याला इंटरनेटवर प्रत्येक बातमी, विषय शोधावा लागतो. मात्र, वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर महत्त्वाच्या बातम्या असतात, आतल्या पानांवर जगातील, राज्यातील आणि स्थानिक बातम्या वाचता येतात. संपादकीय पानावर महत्त्वाच्या विषयाबाबत लेख असतो, बातमीचा अन्वयार्थ असतो. क्रीडा क्षेत्राची माहिती समजते, असे संजय आवटे यांनी सांगितले.