स्थानिकांना रोजगार हवा, कंत्राटी कामगारांना कायम करा; मंत्री उदय सामंतांची जिंदल कंपनीला तंबी

By शोभना कांबळे | Published: September 15, 2023 03:18 PM2023-09-15T15:18:22+5:302023-09-15T15:19:01+5:30

रत्नागिरी : जिंदल कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मच्छीमारांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. स्थानिकांना रोजगार द्यावा, त्याचबरोबर जे ...

Locals want employment, retain contract workers; Minister Uday Samant to Jindal Company | स्थानिकांना रोजगार हवा, कंत्राटी कामगारांना कायम करा; मंत्री उदय सामंतांची जिंदल कंपनीला तंबी

स्थानिकांना रोजगार हवा, कंत्राटी कामगारांना कायम करा; मंत्री उदय सामंतांची जिंदल कंपनीला तंबी

googlenewsNext

रत्नागिरी : जिंदल कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मच्छीमारांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. स्थानिकांना रोजगार द्यावा, त्याचबरोबर जे कंत्राटी तत्वावर आहेत, त्यांना कायम करावे, मच्छीमारांना जे जे हवे ते प्रथम करुन द्यावे, असे सांगतानाच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी जिंदाल कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांवर असेल, असा इशाराही पालकमंत्री उदय सामंत यांनी जिंदल पोर्ट कंपनीच्या उपस्थित तीन अधिकाऱ्यांना दिला.

जयगड येथील मच्छीमारांच्या प्रश्नांसंदर्भात पालकमंत्री सामंत यांनी गुरूवारी (१४ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, प्रादेशिक बंदर अधिकारी संजय उगलमुगले, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिंदाल पोर्ट कंपनीचे अधिकारी सचिन गबाळे, सुदेश मोरे, करुणाकांत दवे आणि मच्छीमार उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले की, उद्योजक सज्जन जिंदल हे एक चांगले उद्योजक आहेत. त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. मच्छिमारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी स्वत: पुढाकार घेत सकारात्मक पाऊले टाकली आहेत. त्याशिवाय कंपनीच्या सीएसआरमधून काही गावांमध्ये सुविधा देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. असे असताना कंपनीचे स्थानिक अधिकारी मात्र, त्यांच्या मनमानीमुळे ते चांगल्या कंपनीला आणि चांगल्या मालक उद्योजकांना बदनाम करत आहेत. मच्छिमारांना त्रास देणारे शुक्ला या अधिकाऱ्याची तात्काळ बदली करावी. त्याशिवाय पुढील चर्चा वा कामकाज सुरु राहणार नाही, असेही ते म्हणाले.

मच्छिमारांवर दाखल झालेल्या खोट्या केसेस काढून टाकण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करेन. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षताही कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी घ्यावी. प्रांताधिकारी, बंदरविभाग व पोलिस विभागांनी संयुक्तपणे मच्छिमारी करण्याबाबत पाहणी करावी. स्थानिकांना रोजगार देत असाल, त्यांच्या समस्या सोडवत असाल, कंपनीच्या सीएसआरमधून मच्छीमारांना सानुग्रह अनुदान मिळत असेल, तर निश्चितपणे आम्ही सर्वजण तुमच्या सोबत असू, असेही ते म्हणाले.

Web Title: Locals want employment, retain contract workers; Minister Uday Samant to Jindal Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.