साहेब लॉकडाऊन करा, पण व्यापाऱ्यांना लाचार मरणापासून वाचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:30 AM2021-05-01T04:30:17+5:302021-05-01T04:30:17+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता कडक लाॅकडाऊन सुरू झालेला आहे. कोरोनाचा वाढता ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता कडक लाॅकडाऊन सुरू झालेला आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता हा लाॅकडाऊन १५ मेपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे मध्यमवर्गीय व्यापारी अक्षरश: भरडला जात आहे. त्याची आजची परिस्थिती पाहता, ‘आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी झाली आहे. तेव्हा मध्यम व्यापाऱ्यांवर लाचारीने मरण पत्करण्याची वेळ आणू नये, काही तास सूट देण्यात यावी, अशी मागणी नवयुग व्यापारी मित्रमंडळाने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
याविषयी मंडळाचे अध्यक्ष शिरीष काटकर यांनी म्हटले आहे की, कोरोनाचे संकट मोठे निश्चितच आहे. आपण कुठंपर्यंत मदत देणार, हेही अडचणीचेच आहे. तेव्हा साहेब आपणास एक नम्र विनंती आहे की, जे अत्यावशक व्यवसाय सुरू आहेत, ते व्यवसाय एक दिवसआड सुरू ठेवावेत. कारण अत्यावश्यक सेवा एक दिवसआड मिळाल्या तरी काहीही फरक पडणार नाही. बाकीचे जे व्यवसाय मागील २५ दिवसांपासून पूर्ण बंद आहेत, त्यांना दिवसातले ४-५ तास तरी सुरू करण्यास परवानगी द्यावी. अत्यावश्क सेवा ज्या दिवशी बंद ठेवता येतील, त्या दिवशी बंद असलेले व्यवसाय सुरू करता येतील.
आज बाजारात गर्दी असतेच. तेवढेच अथवा त्याहीपेक्षा कमी नागरिक बाजारपेठेत बंद असलेल्या व्यावसायिकांकडे येतील. आम्हाला वीजबिल माफ नाही, कामगारांचे पगार वेळेवर देता येत नाहीत, भाडे भरून व्यवसाय करणाऱ्यांना भाडे माफ नाही आणि साहेब, हाच वर्ग जीएसटी आणि वेगवेगळे कर शासनाला भरत असतो. शासनाने आम्हा मध्यमवर्गीय व्यापारी वर्गासाठी (२५ दिवस बंद असलेले ) आवश्यक ते सर्व नियम घालून व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांना दिली आहे.