'निसर्ग' चक्रीवादळात लोकनिर्माण भवनची वाताहत; आर्थिक मदतीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 08:33 PM2020-06-06T20:33:47+5:302020-06-07T17:38:54+5:30

स्थलांतराच्या समस्येवर शिक्षणातून उत्तर शोधणाऱ्या लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यासाला आर्थिक सहकार्याची गरज

lok nirman bhawan in dapoli damaged due to nisarga cyclone needs financial help | 'निसर्ग' चक्रीवादळात लोकनिर्माण भवनची वाताहत; आर्थिक मदतीचं आवाहन

'निसर्ग' चक्रीवादळात लोकनिर्माण भवनची वाताहत; आर्थिक मदतीचं आवाहन

Next

अरबी समुद्रात तयार झालेल्या 'निसर्ग'  चक्रीवादळाचा मोठा फटका कोकणातल्या अनेक गावांना बसला. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील चिखलगावमध्ये, मुख्यत्वे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी 'लोकसाधना' ही सामाजिक संस्थाही त्याला अपवाद नाही. संस्थेच्या महाविद्यालयाच्या 'लोकनिर्माण भवन' या इमारतीची या वादळात वाताहत झाली आहे.

३० किलो वजनाचे चिरे भिंतीतून सुटून दूरवर जाऊन पडले, इतका वाऱ्याचा जोर जबरदस्त होता", अशी माहिती संस्थेचे विश्वस्त ऍड. कैवल्य दांडेकर यांनी दिली आहे. त्याखेरीज ग्रंथालय, आमराई तसेच संस्थेने गावासाठी उभारलेल्या बसथांब्याचेही मोठे नुकसान झाले आहे. जवळपासच्या अनेक गावांमध्ये घरांचे व झाडांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच कोरोना प्रादुर्भावामुळे मनुष्यबळ कमी उपलब्ध आहे. पावसाळा तोंडावर असल्याने ग्रामस्थांचे कामाच्या घाईचे दिवस आहेत. 'या सर्व परिस्थितीत, संस्थेच्या वास्तूंचे नुकसान भरून काढणे आह्वानात्मक आहे', असेही ते म्हणाले.

गेल्या ३८ वर्षांपासून परिसरातील ४६ गावांसाठी शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण आणि समग्र ग्रामविकास अशा पंचसूत्रीवर संस्थेचे काम सुरू आहे. डॉ. राजा दांडेकर आणि शिक्षणतज्ज्ञ रेणू दांडेकर यांच्या दूरदृष्टीच्या व अथक मेहनतीच्या बळावर संस्थेने अनेकांच्या आयुष्यात प्रगतीची पहाट आणली आहे. पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण आणि व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेने, कौशल्ये शिकवून गावात उद्योजकता विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यापलिकडे जाऊन सामाजिक जाणीव जपण्याचा प्रयत्नही आजवर संस्था करत आली आहे. कोरोना संकटकाळात जवळपास ४३ खेड्यांमध्ये सुरू असलेला संस्थेचा 'अन्नदान प्रकल्प' हे त्याचेच एक उदाहरण आहे. हेच सामाजिक भान जपत, शाळेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी कोरोनाच्या संकटातही संस्थेसाठी श्रमदान करायला पुढे येण्याची तयारी दाखवली आहे.

स्थलांतराच्या समस्येवर शिक्षणातून उत्तर शोधणाऱ्या लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यासाला या क्षणी, आर्थिक सहकार्याची गरज आहे. संस्थेला पाठवलेल्या देणगीचा प्रत्येक रुपया चोख हिशेबासह त्या-त्या कामासाठीच वापरला जाण्याचा संस्थेचा लौकिक आहे. www.loksadhana.org या संकेतस्थळाच्या मदतीने आपण संस्थेपर्यंत पोहोचून आपले योगदान देऊ शकता.

आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक वादळे पेललेल्या लोकसाधना परिवारानं याही वादळावर मात करून उभे राहण्याचा चंग बांधला आहे. आणि त्यासाठी समाजाची साथ लाभेल, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

Web Title: lok nirman bhawan in dapoli damaged due to nisarga cyclone needs financial help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.