'बाळासाहेबांच्या विचारांवर नरेंद्र मोदी चालतात', विनोद तावडेंनी 'ती' आठवण सांगितली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 07:19 PM2024-04-24T19:19:51+5:302024-04-24T19:20:46+5:30
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारसभा सुरू आहेत.
Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारसभा सुरू आहेत. दरम्यान, भाजपाचे नेते विनोद तावडे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी तावडे यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
"बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. बाळासाहेबांचे विचार पुढे जात आहे, हाच कोकण वासियांसाठी भावनिक मुद्दा असल्याचा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची पहिल्यांदा भेट घेतली त्यावेळी महाराष्ट्राचा वाघ गुजरातच्या सिंहाचा स्वागत करतोय, हे बाळासाहेबांचे शब्द होते, असे विनोद तावडे म्हणाले.
"नरेंद्र मोदी यांनी एक दिवसही सुट्टी घेतलेली नाही, दिवाळीची सुट्टीही सैनिकांसोबत केली. पूर्णवेळ देशासाठी ते देतात. पहिल्या टप्प्यातील मतदानात जास्त जागा आम्हाला मिळतील. ८० वेळा घटना बदलण्याचे पाप काँग्रेसने केले आहे, असंही विनोद तावडे म्हणाले.
"आपल्या मतदानामुळे अनेकांना गॅस मिळाले, आपण मतदान केल्यामुळे अनेकांचा फायदा होईल यामुळे मतदान केले पाहिजे, ही मानसिकता आता झाली आहे. २०१४ च्या आधी ही मानसिकता नव्हती, असंही विनोदस तावडे म्हणाले.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांची ज्यावेळी भेट घेतली होती, त्यावेळी मी तेथे उपस्थित होतो. महाराष्ट्राचा वाघ गुजरातच्या सिंहाचे स्वागत करत आहे, अशा शब्दात बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले होते',अशी आठवणही विनोद तावडे यांनी सांगितली.