लांब पल्ल्याच्या गाड्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:39 AM2021-04-30T04:39:29+5:302021-04-30T04:39:29+5:30
गुहागर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गुहागर, चिपळूण मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. एसीच्या काही ...
गुहागर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गुहागर, चिपळूण मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. एसीच्या काही बसफेऱ्या अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी सुरू ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती गुहागर आगारप्रमुख वैभव कांबळे यांनी दिली आहे.
वेतनाची प्रतीक्षा कायम
रत्नागिरी : मार्च एंड संपला असला तरीही अजूनही जिल्हा परिषदेतील काही विभागांचा, तसेच पंचायत समित्यांचा मार्च एंड संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे. अजूनही काही विभागातील कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन मिळाले नसल्याने आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे.
भाडे भरण्याची समस्या
खेड : लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून अनेक व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यावर्षीही आता एप्रिल महिन्यात लॉकडाऊनला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय बंद झाले आहेत. या व्यावसायिकांनी भाड्याच्या खोलीत व्यवसाय सुरू केले आहेत. व्यवसायच बंद झाल्याने त्यांच्यासमोर भाडे कसे भरायचे ही चिंता निर्माण झाली आहे.
बेगमीची तयारी सुरू
रत्नागिरी : सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व व्यवहार थांबले आहेत. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली जात आहे. लॉकडाऊनपूर्वी काहीजणांनी पावसाळ्यातील बेगमीची तयारी करून ठेवली होती. सध्या बहुतांश घरात पापड, कुरड्या, शेवया, फेण्या, मसाले, लोणची, आदी पदार्थांसह धान्य वाळविण्याचे काम सुरू आहे.
टेलिफोनीक ओपीडी सेवा
रत्नागिरी : कोरोनाची लक्षणे नसलेल्या अथवा सौम्य लक्षणे असलेल्यांना घरीच अलगीकरणात ठेवले जात आहे. मात्र, काही रुग्णांचे नातेवाईक किंवा रुग्ण तपासणी करून घेण्यासाठी घाबरतात. अशांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून टेलिफोनीक ओपीडी सेवा उपलब्ध करून दिली आहे.
वाहनांची वर्दळ रोडावली
राजापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने लॉकडाऊनला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. नागरिक घरातच अडकल्याने आता वाहनांची वर्दळही थांबली आहे. त्यामुळे रस्त्यावर दिवसभर शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे.
गावांना दिलासा
लांजा : मुंबई- पुणे, आदी कोरोनासाठी हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांना चौदा दिवस सक्तीचे विलगीकरण करण्याचा नियम जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता गावी येणाऱ्या मुुंबईकरांना चौदा दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे, ही बाब गावांना दिलासा देणारी आहे.
ग्रामपंचायतीचा पुढाकार
देवरुख : सध्या सर्वच गावांना कोरोनाशी लढा द्यावा लागत आहे. सध्या ग्राम कृती दलाचा कोरोनाला थोपविण्यात महत्त्वाचा सहभाग आहे. या अनुषंगाने संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील ग्राम कृती दल सक्रिय झाले आहे. सरपंच ऋतूजा कदम आणि उपसरपंच संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना करण्यात येत आहे.
मोरीचे काम अर्धवट
राजापूर : तालुक्यातील पाचल-जवळेथर मार्गावर तळवडे येथील मोरीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीत ही मोरी वाहून गेली होती. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी या मोरीचे बांधकाम झाले; मात्र ते अर्धवट स्थितीतच आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
उकाड्यात वाढ
मंडणगड : एप्रिल महिन्याच्या अखेरीस उष्णता अधिकच तीव्र होऊ लागली आहे. त्यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने दुर्गम भागातील जनतेचे पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे उकाड्यातही मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.