सार्वत्रिक निवडणुकांवर नजर, रत्नागिरीत बदलांमागे राजकीय सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 04:28 PM2018-07-18T16:28:35+5:302018-07-18T16:34:28+5:30
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलल्यानंतर शिवसेनेतही संघटनात्मक बदलांना सुरूवात झाली आहे. सेनेच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदाचा मुकुट आता विलास चाळके यांच्या डोक्यावर चढविण्यात आला आहे. तालुकास्तरावरही फेरबदलांचे संकेत मिळत आहेत.
प्रकाश वराडकर
रत्नागिरी : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलल्यानंतर शिवसेनेतही संघटनात्मक बदलांना सुरूवात झाली आहे. सेनेच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदाचा मुकुट आता विलास चाळके यांच्या डोक्यावर चढविण्यात आला आहे. तालुकास्तरावरही फेरबदलांचे संकेत मिळत आहेत.
सन २०१९ मधील सार्वत्रिक निवडणुकांवर नजर ठेवून आपल्याशी सख्य असलेल्या, मिळतेजुळते घेणाऱ्या व्यक्तींची निवड करून पक्षांतर्गत सोयीचे राजकारण करण्याची रणनीती आखली जात असल्याचे या बदलांवरून दिसत आहे. या बदलांचे परिणाम येत्या काही दिवसात दिसून येणार आहेत.
सन २०१९मध्ये विधानसभा व लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष आता या निवडणुकीच्या तयारीत दंग झाले आहेत.
रत्नागिरी जिल्हा हा सेनेचा बालेकिल्ला मानला जात असला तरी विधानसभेच्या गुहागर व दापोली मतदारसंघात गेल्या वेळी राष्ट्रवादीने बाजी मारली होती. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
त्याचवेळी संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर या दक्षिण रत्नागिरीमधील भागातील सेनेच्या वर्चस्वालाही नाणार व अन्य मुद्द्यांचा भडिमार करीत विरोधकांनी आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे संघटनात्मक बदलांवर भर देताना सेनेतील महत्त्वाच्या नेत्यांनी आपल्या विश्वासातील व्यक्तींची निवड करून २०१९च्या निवडणुकीचे राजकारण आपल्या हाती ठेवता येईल, अशी रणनीती आखल्याची चर्चा आहे.
दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख म्हणून गेल्या दहा वर्षांपासून राजेंद्र महाडिक यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागी खासदार विनायक राऊत यांच्या विश्वासातील विलास चाळके यांची निवड झाली आहे.
राजापूरचे सेना आमदार राजन साळवी हे डॅशिंग नेते म्हणून ओळखले जातात. नाणार प्रकल्पाच्या विरोधातही साळवी यांनी जोरकस भूमिका घेतली. मात्र, या प्रकल्पाबाबत पक्षाची धरसोड भूमिका त्यांच्यासाठी त्रासदायक ठरली आहे. तसेच पक्षातर्फे येत्या निवडणुकीत राजन साळवी यांना पुन्हा उमेदवार मिळणार की नाही, याची चर्चाही आता सुरू झाली आहे.
राजन साळवी यांना विधानपरिषदेवर पाठवून राजापूर विधानसभा मतदारसंघात दुसरा दमदार उमेदवार देण्याबाबत संघटनेत चर्चा आहे. तसे झाल्यास ही संधी कोणासाठी आशेचा किरण ठरणार याकडे सर्वांचे आहे.
दक्षिण रत्नागिरी सेना पक्षसंघटनेत फेरबदलाचे वारे वाहात असतानाच तालुका व विभाग पातळीवरही संघटनात्मक फेरबदल होणार काय, याबाबत शिवसैनिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
जाधव, कदमांची बारी
जिल्हा शिवसेनेतील संघटनात्मक बदलाच्या आधी जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही संघटनात्मक बदल झाले आहेत. जिल्हाध्यक्षपदाचा शेखर निकम यांनी राजीनामा दिल्यानंतर बाबाजी जाधव हे आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष झाले आहेत. शेखर निकम हे राष्ट्रवादीचे चिपळूणचे विधानसभा उमेदवार असतील, अशी चर्चाही आहे. जिल्हा कॉँग्रेसला तब्बल तीन वर्षांनंतर रमेश कदम यांच्या रुपाने जिल्हाध्यक्ष मिळाला आहे.
दापोली, गुहागरवर सेनेचे लक्ष
जिल्ह्यातील विधानसभेच्या पाचही जागा जिंकण्यासाठी शिवसेनेने व्यूहरचना करताना अन्य पक्षात गेलेले नेते व कार्यकर्ते पुन्हा पक्षात कसे येतील, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दापोली मतदारसंघात योगेश कदम यांनी आपला राजकीय प्रभाव वाढवला आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. मात्र, गुहागर विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी अजून कोणते संघटनात्मक फेरबदल होणार, कोणती सक्षम व्यक्ती पुन्हा शिवसेनेत परतणार, याची चर्चाही सुरू आहे.