वाळू उपशावर महसूलची करडी नजर
By admin | Published: November 2, 2014 09:46 PM2014-11-02T21:46:02+5:302014-11-02T23:29:55+5:30
तीन पथके तयार केली
मंडणगड : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असून, याविरुद्ध आता महसूल खात्याने जोरदार मोहीम उघडली आहे. असे गैरप्रकार रोखण्यासाठी महसूलची तीन पथके तयार करण्यात आली असून, ती पथके त्या त्या क्षेत्रात नजर ठेवून राहणार आहेत.महसूल विभागाने शुक्रवारी वाळू उपशाबाबत धडक कारवाई केली होती. यामध्ये चार वाळू व्यावसायिकांवर ३ लाख ४५ हजार ५८८ रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. उमर अहमद मुकादम, अस्लम मुकादम, बाबामियाँ मांडेकर, उस्मान मांडेकर अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या साऱ्यांकडे एकूण ९३ ब्रास अनधिकृ त वाळूसाठा आढळून आला.
एवढी कारवाई करण्यात आली असली तरी महसूल विभागाच्या कारवाईला मर्यादा पडत असल्याचे उघड झाले आहे. कारवाईत पाण्यात बुडवलेले संक्शन पंप दुरुस्ती करुन नंतर वापरले जात असल्याने कर्मचाऱ्यांनी जीव मुठीत धरुन केलेली कारवाई फुकट जात आहे. कारवाई करताना आवश्यक असणारी बोट, लाईफ जॅकेट, गॅस कटर, क्रेन, डंपर उपलब्ध नसल्याने महसूल विभागाची कारवाई म्हणजे दिखाऊपणाच असल्याचे दिसून येत आहे.
म्हाप्रळ, आंबेत पुलानजीक रायगड येथील वाळूमाफिया वाळू उपसा करीत आहेत. महसूल विभागातील काही कर्मचारीच कारवाईपूर्वी त्यांना कल्पना देत असल्याने कारवाई म्हणजे केवळ फार्स ठरतो, असे बोलले जात आहे. मंडणगड हे जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभागाने एकत्रितपणे कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. आगामी काळात अशा प्रकारची मोहीम खाडीपात्रात संयुक्तपणे राबवण्यिात येणार असल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली. महसूल विभागाने वाळू उपशाविरोधात तीन पथके तयार केली आहेत. त्यामुळे आता वाळू उपसा करण्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
मंडणगडात तीन पथकांची निर्मिती.
दिवस-रात्र वाळू उपसा क्षेत्रात ठेवणार नजर.
म्हाप्रळ येथील चार व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई.
चार दिवसांपूर्वी केली कारवाई.