सावकारी पाशात होतेय कर्जदारांची तडफड
By admin | Published: April 29, 2016 12:02 AM2016-04-29T00:02:40+5:302016-04-29T00:27:16+5:30
जमिनीही हडप? : विनापरवाना शेकडो सावकरांचे बस्तान
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या ३६ असली तरी प्रत्यक्षात शेकडो विनापरवाना सावकार कार्यरत असून, त्यांनी बेकायदेशीररित्या अनेकांना दिलेल्या कर्जावर चक्रवाढ पध्दतीने व्याज आकारणी होत आहे. त्यामुळे अशा बेकायदा सावकारांच्या पाशात सर्वसामान्य कर्जदारांची तडफड सुरू आहे. अशा कर्जदारांकडे पठाणी पध्दतीने कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात असून, काहींच्या जमिनीही हडप केल्याची चर्चा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी परवानाधारक सावकारांची संख्या २४ होती. त्यानंतर ३१ मार्च २०१६ला हीच संख्या २४वरून ३६ पर्यंत पोहोचली आहे. चिपळूण व रत्नागिरी शहरासह जिल्ह्याच्या काही अन्य भागातही बेकायदा सावकारी करणाऱ्यांच्या पाशात कर्जदारांची कुतरओढ सुरू आहे. त्यामुळे चक्रवाढ व्याज लावून वसुलीचा तगादा लावणाऱ्या विनापरवाना सावकारांच्या विरोधात आता त्रस्त कर्जदारांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या ३६ आहे. त्यात रत्नागिरीतील २९ आणि चिपळुणातील ७ सावकारांचा समावेश आहे. परवानाधारक सावकार हे या दोन तालुक्यातीलच आहेत. याचा अर्थ अन्य तालुक्यात सावकारी नाही, असा नाही. बेकायदा सावकारी करणाऱ्यांचे जाळे राजापूरपासून थेट मंडणगडपर्यंत पसरले आहे.
जिल्ह्यात केवळ ३६ परवानाधारक सावकारांना संपूर्ण कर्ज व्यवहार हा पारदर्शक ठेवावा लागतो. त्याची वेळोवेळी तपासणीही केली जाते. कोणा कर्जदारावर अन्याय होत नाही ना, याचीही पाहणी केली जाते. त्यामुळेच बॅँकांव्यतिरिक्त परवानाधारक सावकारांकडून कर्ज घ्यावे, विनापरवाना सावकारांकडून कर्ज घेऊ नये, असे आवाहन जिल्हा सहकार निबंधक कार्यलयाकडूनही वारंवार करण्यात येते. तरीही बेकायदा सावकारी करणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. अशा बेकायदा सावकारांनी कर्ज दिल्यानंतर कर्जदारांचा छळ होत असल्याच्याही तक्रारी आहेत. मात्र, त्यांच्या त्रासाबाबत खात्याकडे कोणाच्याही तक्रारी येत नसल्याने अशी बेकायदा सावकारी मोडून काढणे शक्य होत नसल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा : परवानाधारक सावकारांची यादी.
वासुदेव रामचंद्र नार्वेकर, प्रवीण महेंद्र जैन, दिनेश प्रेमजी भणसारी, गोविंद दिनेश गजरा, राजेश दिनकर भुर्के, मे. एस. पी. फायनान्स, विजय शांताराम बार्इंग, हरेश दिनेश गजरा, मंदार दीपक खेडेकर, वैभवी विजय खेडेकर, राजेंद्र बाळकृष्ण इंदुलकर, अवधूत किसन शिंदे, मुकेश दत्ताराम मिरकर, संदीप दिवाकर प्रभू, प्रिया प्रसाद खेडेकर, परशुराम प्रभाकर ढेकणे, लीना गजेंद्र शिर्के, कृष्णांत मोहनराव गायकवाड, अनिल लहू घोसाळे, सुनील प्रभाकर रसाळ, पवन प्रकाश रसाळ, नीलेश शिवाजी कीर, निखील सुनील सावंत, सचिन भिकाजी रायकर, संजय भिकूशेठ हळदणकर, महेंद्र धर्माजी गवळी, शीतल सुजित कीर, दिनेश वसंत राठोड, अशोक अमोल पिलणकर (सर्व रा. रत्नागिरी.) अजय अनंत देवधर, एन. नटरायन, प्रशांत प्रदीप देवळेकर, नितेश माणिकचंद ओसवाल, उदय जयसिंग देसाई, विजय धनंजय जठार, प्रमोद राजाराम गोपाळ (सर्व रा. चिपळूण).