नोकरीच्या आमिषातून लाखो रूपयांची लूट
By admin | Published: August 10, 2016 11:53 PM2016-08-10T23:53:17+5:302016-08-11T00:33:48+5:30
रत्नागिरी जिल्हा : दोन वर्षात लाखोंची फसवणूक झाल्याचे उघड
आकाश शिर्के -- रत्नागिरी -चांगल्या पगाराची नोकरी लावतो... १० लाख भरा आणि जॉईनिंग लेटर हातात घ्या... असे आमिष दाखवून अनेकांची लाखोंची फसवणूक झाली आहे. वारंवार जनजागृती करूनसुध्दा अनेकजण आमिषाला बळी पडत आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षात शहरामध्ये सहाजणांची १४ लाख ४० हजार २०० रुपयांची फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. त्यामध्ये एक गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
शहरामध्ये फसवणुकीचे गुन्हे एकामागोमाग पुढे येत आहेत. त्यामध्ये सायबर गुन्हे, समोरा-समोरील झालेला करार अशा माध्यमातून फसवणूक केली जात आहे. शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींची संख्या अधिक आहे. उच्च शिक्षण घेऊनही या मुलांच्या पदरी निराशा येत आहे. त्यामुळे ही मुले नोकरीच्या आमिषाला बळी पडत आहेत.
रत्नागिरीमध्ये उच्च शिक्षण घेऊनही घरात बसलेल्या तरूणांची संख्या अधिक आहे. त्यामुळे निराश झालेले हे तरुण नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असतात. परंतु नोकरी मिळत नसल्याने आमिषाला बळी पडून स्वत:ची फसवणूक करून घेतात. एखादी अनोळखी व्यक्ती फोनवरून बँकेतून वा कंपनीतून फोन लावून या मुलांना नोकरीला लावतो, दहा लाख भरा आणि नोकरीवर हजर होण्याबाबतचे पत्र त्वरित घ्या, अशी आमिषे दाखवतात.
सन २०१५मध्ये शहर पोलीस स्थानकात दोन गुन्हे दाखल झाले होते. २ जानेवारी २०१५ रोजी त्यामध्ये सर्वांत मोठा गंडा माजी नगरसेविका नाझनीन हकीम यांना बसला होता. मुंबई येथील एका नामांकीत महाविद्यालयात क्लार्कची नोकरी लावतो, असे सांगून १० लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला होता.
या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले होते. त्याचबरोबर दुसरा प्रकार प्रशांत नेरूलकर, रवींद्र खंडागळे व योगेश या तिघांच्या बाबतीत घडला होता. या तिघांना तटरक्षक दलात कामाला लावतो, असे सांगून ३ लाख ९० हजारांची फसवणूक करण्यात आली होती.
सन २०१६मध्ये फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये नोकरीला लावतो, असे सांगून अमित दीक्षित याला ५० हजार २०० रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. बँकेत नोकरी आहे. तुम्ही त्यासाठी इच्छूक आहात का, असे सांगून भूषण सुर्वे यांच्या २८००० रुपयांना चुना लावण्यात आला होता. असे मिळून दोन वर्षात १४ लाख ४० हजार २०० रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. (वार्ताहर)
काही महिन्यांपूर्वी पती-पत्नीला कृषी कार्यालयात व पत्नीला नर्सेसची नोकरी लावतो, असे सांगून १० लाखांची फसवणूक केली असल्याची घटना समोर आली आहे. हातात पैसे देऊन नोकरीवर हजर होण्याचे लेटर न मिळाल्यामुळे आपण फसलो असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
फसवणुकीचे गुन्हे थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळे जनतेची फसवणूक होऊ नये म्हणून वारंवार जनजागृती केली जात आहे. तरीही अनेक लोक या आमिषांना बळी पडून स्वत:ची फसवणूक करून घेत आहेत.
रत्नागिरीच्या माजी नगरसेविका नाझनीन हकीम यांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक करून हकीम यांचा काही मुद्देमाल त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. परंतु बाकीचे पाच गुन्हे शिल्लक असून, या गुन्ह्याची उकल करण्यासाठी तपास युध्दपातळीवर सुरू आहे. फसवणुकीच्या या गुन्ह्यांची वाढती व्याप्ती पाहता चिंता व्यक्त करण्यात येत आहे.