पाचलच्या आठवडा बाजारात काजू उत्पादकांची लूटमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:30 AM2021-03-26T04:30:55+5:302021-03-26T04:30:55+5:30
पाचल : भात शेतीला पर्याय म्हणून काजू शेतीवर भर देणारे शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून काजूला दर मिळत नसल्याने ...
पाचल : भात शेतीला पर्याय म्हणून काजू शेतीवर भर देणारे शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून काजूला दर मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पाचल येथील आठवडा बाजारात स्थानिक दलाल काजू उत्पादक शेतकऱ्यांची लूटमार करीत असून, शेतकऱ्यांचा काजू कवडीमोल दराने खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेला तालुका खरेदी-विक्री संघ याबाबत मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे काजू उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
मागील आठवडा बाजारात सुरुवातीला १२० रुपये प्रती किलाे दराने व्यापाऱ्यांनी काजू खरेदी केला. मात्र, त्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा काजू बाजारात आल्याने १२० रुपये खरेदीचा काजू व्यापाऱ्यांनी ८० रुपये प्रती किलाे दराने खरेदी केला. व्यापारी व दलाल ठरवून काजू दर पाडत आहेत. दलाल व व्यापाऱ्यांवर कोणाचाच अंकुश नसल्याने, दलाल ठरवतील त्या दराने काजू शेतकऱ्यांना द्यावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेला तालुका खरेदी-विक्री संघ बघ्याची भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या राज्यकर्त्यांनी, लाेकप्रतिनिधींनी काजू उत्पादक शेतकऱ्यांना जर हमीभाव बांधून दिला असता, तर काजू उत्पादक शेतकऱ्यांवर आज ही परिस्थिती आली नसती, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, सातत्याने बदलणारे हवामान, अतिवृष्टी, वाढती मजुरी या साऱ्या बाबींचा विचार करता, शेतकऱ्यांच्या काजू उत्पादनाला किमान १५० रुपये प्रती किलाे दर मिळाला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.