कोरोनाला हरवूच - ‘वुई लव्ह अवर जिंदगी....! ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:23 AM2021-06-06T04:23:50+5:302021-06-06T04:23:50+5:30
त्याच पोस्टमध्ये ते लिहितात, ‘लोकांचे योग्य समुपदेशन झाले तर मृत्यूदर कमी व्हायला मदत होईल. म्हणून समुपदेशन ओ.पी.डी. सुरू झाल्या ...
त्याच पोस्टमध्ये ते लिहितात, ‘लोकांचे योग्य समुपदेशन झाले तर मृत्यूदर कमी व्हायला मदत होईल. म्हणून समुपदेशन ओ.पी.डी. सुरू झाल्या पाहिजेत. यावरून आमचे मित्र अभिजीत हेगशेट्ये, मातृमंदिर देवरुख इथे त्यांनी कोविड रुग्णांसाठी समुपदेशन कार्यशाळा नियमित सुरू केली आहे, याची आठवण झाली, त्यांचे अभिनंदन.
आता आपण कोरोना कोविड-१९ साठी रुग्ण अॅडमिट असताना काय दक्षता घ्यावी, याकडे लक्ष पुरवूया. आपण जे ‘प्रोनिंग टेक्निक’ ऑक्सिजन पातळी व्यवस्थित रहावी हे शिकलो, त्यावेळी अॅडमिट असताना आपल्यावर देखरेख करणाऱ्या, उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड अवेक रिपोझिशनिंग प्रोटोकॉल (CARP) कार्प उपयोगात आणू या. यामुळे मध्यम ते सौम्य कोविड रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी वाढू लागते. त्यामुळे कृत्रिम ऑक्सिजन देण्याची प्रक्रिया कमी होते. विशेष म्हणजे अतिदक्षता जी निमोनिया व्यवस्थापनासाठी घ्यावी लागते, त्याला सकारात्मकरीत्या बरे होण्यासाठी आधार मिळतो. हा वरील सांगितलेला कार्प प्रोग्रॅम उपयोगात आणूया; मात्र प्रत्येक कृती आपल्या डॉक्टरांना विचारुनच करावी. व्यवस्थापनातील नर्सिंग मार्गदर्शकाला सूचना द्यावी. म्हणजे त्यांना सकारात्मक होणारे उपचारक बदल उपचाराची निश्चित दिशा ठरविण्यात मदतगार ठरतील.
हा कार्प प्रोग्रॅम १) ३० मिनिटे ते २ तास पूर्ण पालथे झोपणे (FULL PRONE) २) ३० मिनिटे ते २ तास उजव्या कुशीवर झोपणे ३) ३० मिनिटे ते २ तास कॉटच्या आधाराने अर्धवट उठून झोपणे किंवा पडणे यालाच आम्ही प्रॉप्ड अप् सिटींग (PROPPED UP SITTING) असं म्हणतो ४) ३० मिनिटे ते २ तास डाव्या कुशीवर झोपणे आणि ५) ३० मिनिटे ते २ तास रुग्णाला वाटेल ती पोझ घेऊन पालथे झोपणे, हे होय. याच पोश्चरमध्ये ‘भालासन’ छान उपयोगी ठरतं.
अर्थात हेही सत्य आहे की, प्राथमिक निरीक्षण करताना सर्वांनाच ही प्रोन किंवा पालथे पोझिशन उपयोगी होईल, असे नाही. म्हणूनच त्यावर निरीक्षण ठेवणं हे गरजेचं आहे.
कोविड वॉर्डमध्ये अॅडमिट असताना आपली एक जबाबदारी आहे. त्यावेळी हळुवार आवाजात आपल्याला आवडणारं संगीत ऐकावं परमिशन असेल तर. घरी आपली सर्वजण वाट पहात आहेत. आपल्याला आपलं काम सुरू करायचं आहे. ईश्वरीय, वैद्यकीय आणि नैसर्गिक शक्तींवर आपला दृढ विश्वास ठेवावा. कारण आपलं अस्तित्व हेच आपलं जीवन असतं. त्यामुळे ‘मी बरा होतोय’ याच संकल्पनेवर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. हीच तर खरी जिद्द आहे. ती प्रत्येकाकडे आहे. फक्त त्याला प्रज्वलीत करायचं असतं. कारण वुई लव्ह अवर जिंदगी...!
- डॉ. दिलीप पाखरे, रत्नागिरी (भाग२)