रत्नागिरी : मुसाड येथे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 04:07 PM2018-11-12T16:07:22+5:302018-11-12T16:09:25+5:30
खेड तालुक्यातील मुसाड येथील घरात छपरावरून प्रवेश करून एक लाख रुपये रोख रकमेसह आठ तोळे सोन्याच्या दागिन्यांची धाडसी घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड : तालुक्यातील मुसाड येथील घरात छपरावरून प्रवेश करून एक लाख रुपये रोख रकमेसह आठ तोळे सोन्याच्या दागिन्यांची धाडसी घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमारे तीन लाख रुपयांची ही घरफोडी असून चोरट्याला पकडण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. खेड तालुक्यातील मुसाड येथील पोसनाक वाडीतील विकास तुकाराम पोसनाक यांच्या घरी शनिवारी मध्यरात्री ही घरफोडी झाली आहे. विशेष म्हणजे घरामध्ये विकास पोसनाक आणि त्यांचा मुलगा झोपला होता.
हे दोघेही घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या छतावरील कौले काढून घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटात असलेले रोख एक लाख रुपये तसेच एक मंगळसूत्र, दोन लहान सोन्याच्या चेन असा सुमारे दोन लाख १४ हजार रुपये किमतीचे आठ तोळे सोन्याचे दागिने एकूण असा तीन लाख रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
पहाटे विकास पोसनाक यांना जाग आल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. पोसनाक हे इलेक्ट्रिशियन असून त्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. मुंबईला सामान खरेदी करण्यासाठी त्यांनी घरामध्ये एक लाख रुपये रोकड ठेवली होती.
चोरट्यांनी त्या रोख रकमेसह सुमारे आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. घरात माणसे झोपली असतानादेखील झालेल्या या धाडसी घरफोडी मुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घरफोडीचा अधिक तपास खेडचे पोलिस निरीक्षक अनिल गंभीर, पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र्र धालवलकर, हवालदार नरेश चव्हाण करीत आहेत.