चिपळुणातील कोविड केअर सेंटर उभारणीत प्रशासनाचा खो?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:33 AM2021-04-22T04:33:21+5:302021-04-22T04:33:21+5:30
चिपळूण : झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता चिपळूण शहरात कोविड केअर सेंटर सुरू करावे या मागणीने जोर धरला आहे. ...
चिपळूण : झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता चिपळूण शहरात कोविड केअर सेंटर सुरू करावे या मागणीने जोर धरला आहे. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनीही आग्रही भूमिका घेऊन पुढाकार घेतला आहे. शहरातील नामांकित डॉक्टर्सही सहकार्य करण्यास तयार आहेत. नगर परिषदेकडे जागाही उपलब्ध आहे. असे असताना नगर परिषद प्रशासन मात्र कोविड केअर सेंटरसाठी कानावर हात घेऊन असल्याचे आता पुढे येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने होत असल्याने शासकीय आणि खासगी कोविड सेंटर्स आता अपुरी पडत आहेत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत छोटे-छोटे कोविड केअर सेंटर सुरू करणे आवश्यक बनले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात वाढणारी रुग्णसंख्या पाहता चिपळूण नगर परिषदेने शहरात स्वतःचे कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. माजी उपनगराध्यक्ष बाळा कदम यांनी थेट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडेच ही मागणी लावून धरली आहे. या विषयामागील सत्यता आता समोर येऊ लागली आहे.
प्रत्यक्षात शहरात कोविड केअर सेंटरसाठी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे या गेल्या पंधरा दिवसांपासून प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांनी शहरातील काही डॉक्टरांना विश्वासात घेऊन सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली होती. काही सामाजिक संस्थांजवळ याबाबत चर्चा करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर पालकमंत्री परब यांच्याशी झालेल्या व्हीसी चर्चेतदेखील नगराध्यक्षानी हा विषय मांडला होता.
डॉक्टरांची टीम सरसावली
याविषयी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत शहरातील डॉक्टर असोसिएशनच्या टीमने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन बैठकीत दिले होते. या बैठकीला मुख्याधिकारी आणि काही नगरसेवक उपस्थित होते. यावेळी डॉ. यतीन जाधव यांनी पुढाकार घेत चिपळूणच्या जनतेसाठी जेवढे सहकार्य करता येईल, तेवढे सर्व डॉक्टर करतील, असा शब्दही दिला. एवढेच नव्हे तर वैद्यकीय यंत्रणा उभी करण्यासाठी काही डॉक्टरांनी तयारी दर्शवल्याचे पुढे आले आहे.
नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया
नगर परिषदेकडे शासनाकडून प्राप्त झालेला ३५ लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. त्यानुसार कोविड केअर सेंटरचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. खर्च करण्यासाठी नगर परिषद अधिनियम ५६/२/३ या नियमांचा वापर करता येऊ शकतो, असे काही तज्ज्ञांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. मात्र त्यावर अद्याप निर्णय होऊ न शकल्याने या शहराचे मोठे दुर्दैव असल्याची संतप्त प्रतिक्रिया शहरात उमटत आहेत.