अधिकाऱ्यांच्या मनमानीपणाने आगार तोट्यात
By Admin | Published: October 28, 2014 10:50 PM2014-10-28T22:50:32+5:302014-10-29T00:12:15+5:30
आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवासी खासगी सेवेकडे
विनोद पवार - राजापूर -गेल्या काही महिन्यांपासून राजापूर एस. टी. आगारातील अधिकारी मनमानी कारभार करत आहेत. त्याचा परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे. कोणताही विचार न करता तालुक्यातील अनेक गाड्यांच्या मार्गामध्ये अचानक बदल करण्यात येतो. त्याचा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे. राजापूर एस. टी. आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवासी खासगी सेवेकडे वळता दिसत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आगारातील अधिकाऱ्यांनी अनेक गाड्यांच्या मार्गामध्ये बदल केले. त्यामुळे प्रवासी एस. टी. बसने प्रवास करणे टाळत आहेत. राजापूर आगारातून सुटणारी राजापूर-हातदे गाडी अचानकपणे कोंड्येपर्यंत नेण्यात आल्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोच, शिवाय वेळेचाही अपव्यय होत आहे.
समाजात आपली पाठ थोपटली जावी, यासाठीच एखाद-दुसऱ्याने गाडीची मागणी केली तर येथील अधिकारी ती मागणी पूर्ण करतात, असा आरोप आता वाहक-चालकांमधूनच करण्यात येत आहे. मात्र, ती मागणी पूर्ण करताना कोणत्याही प्रकारे भारमानाचा विचार करण्यात येत नसल्याचेही काही कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे राजापूर आगारातील अनेक गाड्या फक्त डिझेल जाळण्याचेच काम करत आहेत. नव्याने उपलब्ध करून दिलेल्या मार्गावर किती भारमान आहे, याचा विचार केला जात नाही. वेळेचा अपव्यय होत असल्यामुळे प्रवासीदेखील खासगी आणि स्वस्त सेवेचा वापर करत आहेत. त्याचाच सर्वाधिक परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे. कोणत्याही प्रकारचा विचार न करता बहुतांश मार्गांवरील गाड्यांच्या मार्गामध्ये बदल केल्यामुळेच आगाराचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले आहे.
काही अधिकारी वेगवेगळे प्रयोग करून आगाराचे उत्पन्न वाढवण्याऐवजी ते कमी करण्यासाठीच हा निर्णय घेत आहेत की काय, अशी शंका घेण्यास जागा आहे. त्यामुळे राजापूर आगाराची स्थिती ‘नाकापेक्षा मोती जड’ अशीच झाली आहे. त्यामुळे मनमानी करणाऱ्या अधिकारी व त्यांच्याभोवती फिरणाऱ्या कंपूवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.