अर्जुना कालव्याच्या अपूर्ण कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:22 AM2021-06-18T04:22:38+5:302021-06-18T04:22:38+5:30

पाचल : पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध होऊनही पाटबंधारे बांधकाम विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे अर्जुना कालव्याचे ...

Loss of farmers due to incomplete work of Arjuna canal | अर्जुना कालव्याच्या अपूर्ण कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

अर्जुना कालव्याच्या अपूर्ण कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

Next

पाचल : पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध होऊनही पाटबंधारे बांधकाम विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे अर्जुना कालव्याचे काम गेले दोन वर्षे रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

अर्जुना प्रकल्पाकडे जिल्ह्यातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पाहिले जाते. हा प्रकल्प पूर्णत्वाला गेला असून, या धरणात पाण्याचा साठाही मुबलक प्रमाणात आहे. मात्र, कालव्याची कामे पूर्ण करण्यात आली नसल्याने परिसरातील शेतकरी धरण्याच्या पाण्यापासून आजही वंचित आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान सिंचन योजनेतून कालव्याच्या कामासाठी दोन वर्षांपूर्वीच कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, पाटबंधारे बांधकाम विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे डाव्या व उजव्या कालव्यांची कामे रखडली आहेत. मागील वर्षी प्रकल्पाच्या कालव्यासाठी उत्खनन करण्यात आलेली माती जैसे थे ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेती करता न आल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना वारंवार सांगूनही दखल घेतलेली नाही.

पूर्वी या कालव्याचे काम ओपन कालवा पध्दतीने करण्यात येणार होते. मात्र, आता या कामात बदल करून बंदिस्त पाईपद्वारे करण्यात येत आहे. या कालव्याचे डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूने काम सुरू आहे. नियोजित मार्गातून पाईपलाईन टाकण्यासाठी जमिनीचे खोदकाम सुरू आहे. मागील वर्षी पाईपलाईन टाकताना खोदण्यात आलेली माती तशीच ठेवण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करता आली नाही. खोदकाम करताना सापडलेले मोठ-मोठे दगड न उचलता ते शेतकऱ्यांच्या शेतातच ठेवण्यात आले. तसेच खोदलेले चर व्यवस्थित न भरल्याने त्यातून वाहून गेलेली माती इतरत्र शेतीत पसरली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

बऱ्याच ठिकाणी खोदकाम करताना शेतकऱ्यांच्या बागायती व कुंपणाचेही नुकसान झालेले आहे. आंबा-काजू बागायतींचे मागणी करूनही अद्याप मूल्यांकन करण्यात आलेले नाही. मूल्यांकनच झाले नसल्याने शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत. येथील शेतकऱ्यांचे शेती हेच उत्पन्नाचे एकमेव साधन असल्याने शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Loss of farmers due to incomplete work of Arjuna canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.