खेडमध्ये नुकसानीचा आकडा ४० कोटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:32 AM2021-07-31T04:32:05+5:302021-07-31T04:32:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : शहरातील मुख्य बाजारपेठेत घुसलेल्या पुराच्या पाण्यामुळे अवघी बाजारपेठच उद्ध्वस्त झाली आहे. प्रशासनाचे पूरग्रस्त भागातील ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : शहरातील मुख्य बाजारपेठेत घुसलेल्या पुराच्या पाण्यामुळे अवघी बाजारपेठच उद्ध्वस्त झाली आहे. प्रशासनाचे पूरग्रस्त भागातील पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या चार दिवसांत तब्बल ८०० बाधित दुकानांसह ६०० घरांचे पंचनामे करण्यात करण्यात आले. या पंचनाम्यांनुसार तब्बल ४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे. व्यापाऱ्यांचे १७ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
नगर परिषदेच्या मालमत्तेच्या १० कोटींचा समावेश असून, एका बँकेसह ११ वाहनांची एक कोटी रुपयांची हानी झाली आहे. २००५ साली झालेल्या पुराची पुनरावृत्ती या वर्षी झाली. सलग दोन दिवस मुख्य बाजारपेठ पुराच्या पाण्यात अडकली होती. यामुळे दुकानांची दयनीय अवस्थाच झाली असून, साहित्याची अतोनात हानी झाली आहे. सर्वाधिक फटका व्यापाऱ्यांना बसला असून, पुराच्या पाण्यामुळे सारेच वाहून गेले आहे. पूरस्थिती ओसरल्यानंतर तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मात्र, पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या कचऱ्याची व्याप्ती मोठी असल्याने गेल्या पाच दिवसांपासून व्यापारी दुकाने स्वच्छ करण्यातच मग्न आहेत. नगर प्रशासनाने सलग पाच दिवस स्वच्छता मोहीम राबवून बाजारपेठेतील परिसर स्वच्छ केला आहे.
मुख्य बाजारपेठ स्वच्छ झाली असली तरी काही दुकानांमध्ये साचलेला चिखल अजूनही कायमच आहे. पूरस्थिती ओसरताच महसूल विभागाने तातडीने पंचनाम्याचे काम हाती घेतले आहे. तब्बल ८०० व्यापाऱ्यांना पुराचा फटका बसला असून, नुकसानीचा आकडा २७ कोटींवर पोहोचला आहे. मुख्य बाजारपेठेसह साठे मोहल्ला, पाैत्रिक मोहल्ला, गुजरआळी व इतर भागांतील ६०० घरे पुराच्या पाण्यात बाधित झाली. बाधित घरांच्या नुकसानीचा आकडा दोन कोटींवर पोहोचला आहे. नगर परिषदेच्या मालमत्तेचीही अतोनात हानी झाली आहे. नगर परिषोच्या दवाखान्यासह शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या कोविड सेंटरलाही पुराचा फटका बसला आहे.
-------------------------------
नगर परिषदेशी संपर्क साधा
खेड शहरातील पूरग्रस्त भागातील बाधित घरे व दुकाने यांचे पंचनामे करण्यात आले आहेत. तरीही कोणाच्या काही अडचणी व तक्रारी असल्यास थेट नगर परिषदेत संपर्क साधा. यासाठी नोडल अधिकारी म्हणून संजय आपटे व परशुराम पाथरे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली.
-------------------------
खेड शहरात पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले.