लोटिस्मा वस्तू संग्रहालयाला मिळाला तोफेचा गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 12:19 PM2021-04-06T12:19:26+5:302021-04-06T12:22:02+5:30
Chiplun TilakSmarak Ratnagiri- चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने उभारेलेल्या वस्तू संग्रहालयाला नुकताच १ किलो ६८५ ग्रॅम वजनाचा तोफेचा गोळा मिळाला आहे. युनायटेड इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक मुकुंद कानडे यांना त्यांच्या विंध्यवासिनी परिसरातील घराच्या जागेत हा गोळा मिळाला. त्यांनी तो वाचनालयाच्या संग्रहालयाला दिला आहे.
चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने उभारेलेल्या वस्तू संग्रहालयाला नुकताच १ किलो ६८५ ग्रॅम वजनाचा तोफेचा गोळा मिळाला आहे. युनायटेड इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक मुकुंद कानडे यांना त्यांच्या विंध्यवासिनी परिसरातील घराच्या जागेत हा गोळा मिळाला. त्यांनी तो वाचनालयाच्या संग्रहालयाला दिला आहे.
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपले हे संग्रहालय २४ नोव्हेंबर २०१८ रोजी मूर्तीशास्त्र आणि मंदिरस्थापत्य या विषयातील अधिकारी व्यक्तिमत्त्व डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते पर्यटक, अभ्यासक, जिज्ञासूंसाठी पाहण्यास खुले केले आहे. भगवान परशुराम यांचे वास्तव्यस्थान, क्रोकोडाईल टुरिझमसाठी प्रसिद्ध ऑफबीट डेस्टीनेशन चिपळुणातील हे संग्रहालय कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचे वैभव आहे. संग्रहालयात चिपळूण परिसरातील अनेक वस्तू पाहायला मिळतात. आता इथल्या युद्धभूमीवरील तोफगोळा मिळाला आहे.
विंध्यवासिनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ही इतिहासकाळात युद्धभूमी होती. या चौकात आदिलशाही सरदार शेख बहादूर याला तत्कालिन राजे बारराव कोळी यांनी ठार केले होते. पुढे याच परिसरात आदिलशाही सरदार शिंदे आणि राजे बारराव कोळी यांच्यात मोठी लढाई होऊन कोळ्यांचा पराभव झाला. राजे बारराव कोळी यांचे कोणतेही निशाण पाहण्यात नसले तरी शहरातील वडनाक्यावर असलेली एकवीरा देवी ही यांची कुलदेवता म्हणून स्थापन झालेली होती. मुकुंद कानडे यांनी संग्रहालयाला तोफगोळा भेट दिल्याबद्दल लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्यवाह धनंजय चितळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
एकमेव संग्रहालय
भारतीय मातीतील दोन लाख वर्षांपूर्वीच्या मानवी वापरातील पुराश्मयुगीन हत्यारांपासून कोकणी वापरातील गेल्या दोन-पाचशे वर्षातल्या विविध वस्तूंचा दुर्मीळ ठेवा पाहायला उपलब्ध असलेले पनवेल ते पणजी दरम्यानचे हे एकमेव संग्रहालय आहे. यापूर्वी रामतीर्थ तलाव परिसरात शिवकालीन नाणी मिळाली होती. प्राचीन वस्तूंचे जतन करण्याचे काम संग्रहालयाद्वारे करण्यात येत आहे. या संग्रहालयात नागरिकांनी जुन्या, दुर्मीळ वस्तू देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.