लोटे, गुहागरात मोठे उद्योग प्रस्तावित
By admin | Published: May 3, 2016 11:35 PM2016-05-03T23:35:27+5:302016-05-04T00:45:17+5:30
रवींद्र वायकर : कोकण विकासाला गती देण्याला सर्वाेच्च प्राधान्य; खेड्यांना पक्के रस्ते
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातून कोकणच्या विकासाला गती देणं यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजना’ राज्यात राबविण्यात येत आहे. यामुळे कोकणातील खेड्यांना चांगले पक्के रस्ते उपलब्ध होणार आहेत, असे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितले. ‘मेक इन महाराष्ट्र’ धोरणातून जिल्ह्यात लोटे-परशुराम औद्योगिक क्षेत्रात, तसेच गुहागर परिसरात मोठे उद्योग प्रस्तावित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंंदे, परिविक्षाधीन अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.
वायकर म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यातील ४७ गावांमध्ये जलसमृध्दीची कामे सुरु आहेत. आता यामध्ये नव्याने सन २०१६-१७ साठी २७ गावांचा समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात असलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातदेखील काही ठिकाणी भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी - कर्मचारी हे आपले एक दिवसाचे वेतन देणार आहेत. या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले.
रत्नागिरी पर्यटन महोत्सवातून चिपळूण परिसरातील बॅकवॉटर पर्यटनाची ओळख होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते महसूल विभागात उत्कृष्ट काम करणारे सहाय्यक जिल्हाधिकारी विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर, तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, महसूल विभागाच्या तहसीलदार प्रियंका आयरे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच चिपळूण तालुक्यातील टेरवचे तलाठी व्ही. डी. मोहिते यांना आदर्श तलाठी पुरस्कार, पोलीस महासंचालक पदकप्राप्त राजेंद्र सुर्वे, स्थानिक गुन्हे शाखेचा चमूचा, पोलिसांना मदत करणाऱ्या सचिन जंगम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचा उत्कृष्ट लघु उद्योजक प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मे. सावरकर फुडस्, म्हाबळे (ता. संगमेश्वर) यांना तर द्वितीय पुरस्कार सतीश पांडुरंग पेडणेकर, भागीदार मे. विजय इंजिनिअरींग कंपनी, रत्नागिरी यांना देण्यात आला. (प्रतिनिधी)
रत्नागिरीतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सौभाग्यवतींनी एकत्रित येऊन बचतगट सुरू केला आहे. या बचत गटातील महिलांचा पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी सत्कार करण्यात आला.
कॅमेऱ्यांचे नियोजन : गावांचा विकास
समुद्रकिनाऱ्यावरील संवेदनशील ठिकाणे आणि शहरातील अंतर्गत भागात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पोलीस दलाने महिला सुरक्षेसाठी विकसित केलेले ‘प्रतिसाद’ हे मोबाईल अॅप राज्यात एक आदर्श प्रयोग आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे. अंतर्गत सुरक्षेबरोबरच भारतमातेच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या जिल्ह्यातील शहीदांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असून, या अंतर्गत शहीदांच्या गावांचा नाविन्यपूर्ण योजनेतून आदर्श गाव म्हणून विकास करण्यात येणार आहे.