लोटे घाणेखुंट बाजारपेठेत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:28 AM2021-04-19T04:28:54+5:302021-04-19T04:28:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : संचारबंदीच्या धर्तीवर वीकेंड लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करत खेड तालुक्यातील लोटे घाणेखुंट बाजारपेठेत शनिवारी पूर्णत: ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आवाशी : संचारबंदीच्या धर्तीवर वीकेंड लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करत खेड तालुक्यातील लोटे घाणेखुंट बाजारपेठेत शनिवारी पूर्णत: शुकशुकाट होता.
जिल्ह्यात १४ एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यानंतर राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फारसा परिणाम लोटे घाणेखुंट बाजारपेठेसह पिरलोटे, आवाशी, असगणी, दाभिळ, लवेल गावांत दिसून आला नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गावातून अनेक दुकाने उघडी होती. नागरिकही मोठ्या प्रमाणावर बाजारात व इतरत्र फिरत होते. त्यामुळे संचारबंदी की मुक्त संचार अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, १६ एप्रिलपासून सायंकाळनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच यंत्रणेस दिलेल्या आदेशानुसार येथील बाजारपेठा हळूहळू बंद होऊ लागल्या. याच धर्तीवर शनिवार व रविवार असणाऱ्या वीकेंड लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करत या परिसरातील औषधी दुकाने व दवाखाने वगळता सर्वच दुकाने बंद होती. मात्र, अजूनही व्यावसायिक व नागरिक यांच्यात संभ्रम असून सोमवारपासून पुन्हा अत्यावश्यक सेवा सुरू राहतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गुरुवार व शुक्रवार या दोन दिवशी येथील केवळ कापड व्यावसायिक, हार्डवेअर मटेरिअल, इलेक्ट्रिक वस्तू, भांडी दुकाने, ज्वेलर्स या व अशी काही मोजकीच दुकाने वगळता अन्य दुकाने सुरू होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा स्थानिक यंत्रणांना स्पष्ट आदेश देऊन व्यावसायिक व नागरिकांचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी होत आहे.