वार्धक्यातही शेतीची आवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:21 AM2021-07-21T04:21:32+5:302021-07-21T04:21:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वडिलोपार्जित शेती करीत असतानाच गेल्या ३० ते ३५ वर्षांत प्रयोगशील वृत्तीमुळे शेतीमध्ये सातत्याने नवनवीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : वडिलोपार्जित शेती करीत असतानाच गेल्या ३० ते ३५ वर्षांत प्रयोगशील वृत्तीमुळे शेतीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग सुधीर खांडेकर करीत आहेत. घाटीवले येथील खांडेकर ७२ वर्षांचे आहेत, मात्र कोकणच्या लाल मातीत विविध उत्पादने घेत असताना, उत्पन्नवाढीवर त्यांचे विशेष लक्ष आहे.
पावसाळ्यात पावणेदोन एकर क्षेत्रावर भात लागवड करीत असून दरवर्षी ते ४० ते ४१ टन भाताचे उत्पादन घेत आहेत. अधिक उत्पादनासाठी काेमल, सोना, पंकज, रुपाली यासारख्या वाणांची लागवड ते करीत आहेत. भात काढणीनंतर भुईमूग, कुळीथ, पावटा, हिरवी मिरची याशिवाय विविध प्रकारच्या पालेभाज्यांची लागवड करून उत्पादन घेत आहेत. बारमाही शेती करीत आहेत.
उर्वरित क्षेत्रावर बागायती फुलविली असून त्यामध्ये नारळ, आंबा, काजू लागवड केली आहे. विद्यापीठ प्रमाणित वेंगुर्ला ४ व ७ लागवड केली आहे. आंबा, काजू, नारळाचे चांगले उत्पन्न मिळत असून स्थानिक पातळीवरच विक्री करीत आहेत. काजू खरेदीसाठी व्यापारी त्यांच्याकडे येतात. आंब्याचाही दर्जा उत्तम प्रतीचा असल्याने मुंबई, पुणे मार्केटसह खासगी विक्री चांगली होते.
भुईमुगाचे उत्पन्न
पावणे दोन गुंठ्यावर ते भुईमूग लागवड करीत असून गतवर्षी ३५० किलो शेंगा प्राप्त झाल्या होत्या. शेंगा न विकता त्याचे तेल काढून घेतले आहे. ५३ लीटर तेल त्यांना प्राप्त झाले असून २७५ किलो पेंड मिळाली आहे. पाली येथे गाळप होत असल्याने त्यांना सोपे झाले. पेंड गुरांना खाद्य म्हणून वापरली जात आहे.
शंभर टक्के सेंद्रिय उत्पादने
उन्हाळ्यात विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पन्न खांडेकर घेत असून गावात त्यांचे स्वत: दुकान आहे. त्यामुळे दुकानातून भाज्यांची विक्री सहज होत आहे. भात असो वा भाजीपाला, बागायती शंभर टक्के सेंद्रिय उत्पादने घेण्यावर त्यांचा भर आहे.
दुग्ध उत्पादनाबरोबर खते
शेतीला जोडव्यवसाय म्हणून त्यांनी मुरा जातीच्या चार म्हशी व एक गाय सांभाळली आहे. दूध उत्पादन प्राप्त होत असून गावातच विक्री होत आहे. गोबरगॅस प्लॅन्ट असून त्यासाठी शेणाचा वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांचा इंधनाचा खर्च मात्र वाचत आहे.
यांत्रिक अवजारांचा वापर
बारमाही शेती असल्याने खांडेकर यांच्याकडे चार ते पाच लोकांना कायमस्वरूपी काम प्राप्त झाले आहे. श्रम व मूल्य बचतीचे महत्त्व त्यांना उमगले असल्याने यांत्रिक अवजारांचा वापर ते करीत आहेत. पाॅवर टिलर, ग्रासकटर, पाॅवर स्प्रेअरचा वापर आवर्जून करीत आहेत. विहिरीला पंप बसविला असून उन्हाळ्यात पाण्याचा वापर केला जातो, मात्र मे महिन्यात पाण्याची टंचाई भासते त्यावेळी नदीला पंप बसवून पाणी शेतीसाठी वापरले जात आहे.
उत्पादन विक्री
भाजीपाला विक्री तर केली जात आहे. शिवाय कुळीथ, पावटा विक्रीबरोबर कुळीथ पीठ तयार करून विक्री करीत आहेत. उत्पादन वाढविण्यासाठी संकरीत भाताच्या वाणाचा वापर करण्यात येत आहे.
---------------------------
शेतीकडे व्यावसायिकदृष्ट्या लक्ष केंद्रित केले तर नक्कीच फायदा होऊ शकतो. बारमाही शेती करीत असताना, शंभर टक्के सेंद्रिय शेतीवर भर आहे. संकरीत वाणामुळे उत्पादनात वाढ होत आहे.
- सुधीर खांडेकर, घाटीवले