शीळ धरणात कमी पाणीसाठा; रत्नागिरी शहरात येत्या सोमवारपासून एक दिवसा आड पाणीपुरवठा
By मेहरून नाकाडे | Published: May 10, 2024 06:04 PM2024-05-10T18:04:41+5:302024-05-10T18:04:57+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी शहराला सद्यस्थितीत एकमेव ‘शीळ’ धरणावरून पाणी पुरवठा सुरू आहे. वाढत्या उष्म्यामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ...
रत्नागिरी : रत्नागिरी शहराला सद्यस्थितीत एकमेव ‘शीळ’ धरणावरूनपाणी पुरवठा सुरू आहे. वाढत्या उष्म्यामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने धरणातीलपाणीसाठा खालावत आहे. मान्सून पर्यंत नागरिकांना पाणीपुरवठा पुरेसा करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेतर्फे सोमवार दि. १३ मे पासून एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘अल निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रियेतूचा यावर्षीच्या पर्जन्यमानावर परिणाम झाला आहे. गतवर्षी सरासरी पर्जन्यमान झाल्यामुळे शीळधरणात कमी पाणीसाठा झाला होता. शिवाय उष्मा वाढल्यामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. सध्या शीळ धरणात ०.८१४ दशलक्षघनमीटर इतका उपयुक्त म्हणजेचे २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
यावर्षी मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्यास व धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आल्यास दुसरा कोणताही जलस्त्रोत किंवा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे भीषण पाणटंचाई उद्भवू शकते. नागरिकांना पाणी टंचाईची झळ बसू नये यासाठी एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे.