गतवर्षीपेक्षा कमी, तरी झळ कायम
By admin | Published: May 10, 2016 02:08 AM2016-05-10T02:08:39+5:302016-05-10T02:28:56+5:30
प्रत्यक्षात आकडा हजारात : तब्बल ५४ गावांतील ९८ वाड्यांना पाणीटंचाईने घातलाय विळखा
रहिम दलाल --रत्नागिरी जिल्ह्यात टंचाईग्रस्त १२,२०९ लोकांची शासन दरबारी नोंद असली तरी प्रत्यक्षात लाखभर लोकांना पाणीटंचाई भेडसावत आहे. आज जिल्ह्यात ५४ गावांतील ९८ वाड्यांमध्ये पाणीटंचाईने विळखा घातला आहे.
जिल्ह्यातील अनेक वाड्या अजूनही तहानलेल्या आहेत. उन्हाळ्यात या वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवू लागली की, यावर तात्पुरता उपाय म्हणून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. परंतु टँकरने मिळणाऱ्या पाण्यावर किती वर्षे तहान भागवणार? या वाडी - वस्त्यांची कायमची तहान भागवण्यासाठी पाण्याचा पर्याय उपलब्ध होणे गरजेचे आहे. पाणीटंचाईला सामोरे जाणारे लोक भीषण वास्तव नीमूटपणे सहन करत आहेत.
जिल्ह्यात एप्रिल २०१६मध्ये पाण्याचा पहिला टँकर धावू लागतो. ग्रामीण भागासह शहरी भागातही मोठ्या प्रमाणात खासगी विहिरींचे मालक पाणी विक्रीचा व्यवसाय करीत असून, दररोज हजारो रुपयांची कमाई करीत आहेत.
गेल्या पावसाळ्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. मात्र, पाणीटंचाईची तीव्रता गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. कमी पावसामुळे यावर्षी पाणीटंचाई तीव्र होणार असे वाटत होते. ग्रामीण भागामध्ये उभारलेल्या सुमारे ५००० बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईच्या झळा कमी बसत आहेत. मात्र, कच्चे बंधारे, विहिरी, नद्या, नाले, तलाव आटल्याने येत्या काही दिवसांत जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
गतवर्षी आजच्या दिवशी ६० गावातील १२२ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई होती. यंदा त्यापेक्षा कमी गावांमध्ये पाणीटंचाई आहे. आठवडाभराच्या कालावधीत जिल्ह्यात १० गावांतील २३ वाड्यांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. त्यामुळे आज ५४ गावांतील ९८ वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. या टंचाईग्रस्तांना शासकीय १० आणि खासगी ४ अशा एकूण १४ टँकर्सनी पाणीपुरवठा सुरू आहे. आतापर्यंत या टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठ्यासाठी टँकर्सद्वारे ७४७ फेऱ्या मारल्या आहेत. टंचाईग्रस्तांमधील अनेक वाड्या डोंगराळ भागात असल्याने पाण्याचा टँकर नेताना चालकाला मोठी कसरत करावी लागते.
पाणीटंचाईचा फटका १२,२०९ लोकांना बसला असल्याची नोंद शासन दरबारी असली तरी प्रत्यक्ष लाखभर लोक पाण्यासाठी वणवण भटकंती करीत आहेत. अनेक गावांतील विहिरी, तलाव, विंधन विहिरी, पाण्याचे स्रोत आटल्याने लोकांची पाण्यासाठी तडफड सुरु आहे.