लोटेत लिटमस कंपनीत वायूगळती; १३ जणांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 11:20 PM2018-12-02T23:20:43+5:302018-12-02T23:20:49+5:30
आवाशी : खेड तालुक्यातील लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीतील लिटमस आॅर्गेनिक कंपनीत अमोनिया वायूची गळती झाल्याने १३ ग्रामस्थांना बाधा ...
आवाशी : खेड तालुक्यातील लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीतील लिटमस आॅर्गेनिक कंपनीत अमोनिया वायूची गळती झाल्याने १३ ग्रामस्थांना बाधा झाली. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक असून, या सर्वांवर लोटे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी सकाळी ७च्या सुमारास घडली.
दरम्यान, अशी कोणतीही वायूगळती झाली नसल्याचे कंपनी मालक शुभांग शहा यांनी सांगितले. याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिटमस् आॅर्गेनिक कंपनीत उत्पादनासाठी अमोनिया वायूचा वापर केला जातो.
रविवारी सकाळी या वायूची गळती झाल्याने सुनंदा बाबाजी कांदेकर (६५), बाबाजी तानू कांदेकर (८०), भाग्यश्री बाबाजी कांदेकर (४३), सिद्धी जयराम कांदेकर (२४), मंदार मंगेश दळवी (१६), तन्मय संदीप भोमे (७), रुषा संदीप भोमे (३), प्रियांका पांडुरंग इंगळे (३५), रिया प्रशांत आंब्रे (८), वैदेही प्रशांत आंब्रे (४), सुनीता परशुराम आंब्रे (५०), मालिनी जयराम कांदेकर (५२) व जयराम पांडुरंग कांदेकर (५५) यांना याचा त्रास जाणवू लागला. डोळ्याला जळजळ, श्वास गुदमरणे, दम लागले, छातीत दुखणे अशा प्रकारचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
यापैकी सुनंदा कांदेकर, भाग्यश्री कांदेकर, जयराम कांदेकर, बाबाजी कांदेकर या चौघांची प्रकृ ती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची फिर्याद जयराम
कांदेकर यांनी लोटे पोलीस स्थानकात
दिली आहे. घटनेची माहिती मिळताच
खेडचे पोलीस निरीक्षक अनिल
गंभीर, पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र धालवलकर, विवेक साळवी, भूषण
सावंत, निखिल जाधव यांनी कंपनीत
भेट देऊन बाधितांना रुग्णालयात दाखल केले. युवा सेनेचे चेतन वारणकर व
त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यासाठी मोठी मदत केली.
वायूगळती झालेली नाही : शुभांग शहा
या घटनेबाबत कंपनी मालक शुभांग शहा यांना भ्रमणध्वनीवर विचारणा केली असता कोणत्याही प्रकारची वायूगळती वगैरे काहीही घडलेले नाही. हे रहिवासी मला कायम या ना त्या कारणाने त्रास देत असतात. आता मी लोटे येथील कंपनीत नसून हैद्राबाद येथे आहे. दोन दिवसांपूर्वी जेव्हा मी कंपनीत होतो तेव्हाही येथील काही रहिवाशांनी मला मारहाण केली होती. या घटनेनेही माझ्या व्यवस्थापकाला रहिवाशांनी मारहाण केली आहे. याचाच अर्थ आम्ही उद्योग चालवायचे की नाहीत? असा सवाल त्यांनी केला आहे.
गुन्हा दाखल
लिटमस आॅर्गेनिक कंपनीत झालेल्या वायूगळतीप्रकरणी उत्पादनातील यंत्रसामग्रीत केलेला हलगर्जीपणा याचा ठपका ठेवून कंपनी मालक, व्यवस्थापक आणि पर्यवेक्षक यांच्यावर सायंकाळी खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.