LPG गॅस टँकर नदीत कोसळला; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 08:57 AM2022-09-23T08:57:15+5:302022-09-23T08:58:05+5:30
या टँकरमधून होणाऱ्या गॅसगळतीमुळे आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरीच्या अंजनारी पुलावरील वाहतूक अद्यापही ठप्प असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. गेल्या १५ हून अधिक तासांपासून महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. लांज्याजवळील पुलावरून एलपीजी गॅस टँकर नदीत कोसळल्याने या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अपघातग्रस्त टँकरमधील गॅसगळती थांबल्यानंतरच याठिकाणी वाहतूक पूर्ववत होणार आहे. तोपर्यत पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केले आहे.
गुरुवारी दुपारी ३-४ च्या सुमारास भारत पेट्रोलियम कंपनीचा गॅस टँकर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. रत्नागिरीतील लांज्याजवळ अंजनारी पूलावर वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा टँकर नदीत कोसळला. अपघातानंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅसगळती होऊ लागल्याने याठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. जोपर्यंत गॅस बाहेर सुरक्षित काढला जात नाही तोपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. मागील १५ हून अधिक तासांपासून ही वाहतूक बंद असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान या टँकरमधून होणाऱ्या गॅसगळतीमुळे आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. जिल्हा प्रशासनाकडून कुठलीच माहिती देण्यात आली नाही असं स्थानिकांनी म्हटलं. तर गोवा आणि उरणहून तज्ज्ञांची टीम लवकरच घटनास्थळी दाखल होईल. तज्ज्ञांच्या मदतीनं अपघातग्रस्त टँकरमधून गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात येईल. मात्र या प्रक्रियेला किती वेळ जाईल हे सांगता येत नसल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे.
पर्यायी मार्गानं वाहतूक वळवली
अंजनारी पुलावरील वाहतूक बंद असल्याने या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी पुणस, काजगघाटी, रत्नागिरी, तर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांनी शिपोली, पाली, दाभोळे या पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाने केले आहे.