रत्नागिरीतील समुद्रात डांबराच्या गुठळ्या, गळती सुरु झालेल्या जहाजातील असल्याचा संशय
By अरुण आडिवरेकर | Published: September 23, 2022 04:40 PM2022-09-23T16:40:00+5:302022-09-23T16:40:40+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपघातग्रस्त ‘पार्थ’ जहाजातून तेल गळती सुरु झाली आहे. या गळतीनंतर राजापूर तालुक्यातील नाटे ते गावखडीच्या समुद्रात १८ वावात मोठ्या प्रमाणात डांबराच्या गुठळ्या तरंगताना मच्छिमारांना दिसल्या.
रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपघातग्रस्त ‘पार्थ’ जहाजातून तेल गळती सुरु झाली आहे. या गळतीनंतर राजापूर तालुक्यातील नाटे ते गावखडीच्या समुद्रात १८ वावात मोठ्या प्रमाणात डांबराच्या गुठळ्या तरंगताना मच्छिमारांना दिसल्या. या गुठळ्या गळती सुरु झालेल्या जहाजातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
रत्नागिरी कोस्ट गार्डच्या ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरद्वारे रत्नागिरी ते गोवा रेकी करण्यात आली. रत्नागिरी ते गोवा या दोन तासांच्या सोर्टीमध्ये तेल प्रदूषणाचा कोणताही गंभीर धोका आढळलेला नसल्याचे सांगण्यात आले आहे. सिंधुदुर्ग किनाऱ्यापासून ७-८ मैल अंतरावर तेलाचा पातळ थर आढळला असून, त्याची स्वत:हून बाष्पीभवन होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, अपघात ग्रस्त ‘पार्थ’ तेलवाहू जहाजामधून मोठ्या प्रमाणात तेलाची गळती सुरू झाली आहे. राजापूर तालुक्यातील साखरीनाटे - आंबोलगड - वेत्ये - किनाऱ्यासमोर १८ वाव खोल समुद्रात दोन दिवसापासून ठिकठिकाणी डांबराच्या गुठळ्या तरंगताना मच्छिमारांना दिसल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, या डांबराच्या गुठळ्या गावखडीपर्यंत आल्याचे सांगण्यात येत आहे.
रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्याजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या डांबराच्या गुठळ्याबाबत मच्छिमारांनी मत्स्य खात्याला माहिती दिली आहे. त्यानंतर सारी यंत्रणा सतर्क झाली आहे.