परदेशात नोकरी लावण्याचे आमिष, रत्नागिरीतील १३ तरुणांना लाखोंचा गंडा
By अरुण आडिवरेकर | Published: June 14, 2023 12:56 PM2023-06-14T12:56:18+5:302023-06-14T12:56:36+5:30
तरूणांना व्हिसा, परमिट, खोटी तिकिटे व काही कागदपत्रेही दिली
रत्नागिरी : तुर्की, मलेशिया, कुवेत या देशांमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत १३ तरुणांची १४ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार मोहम्मद सलीम अब्दल्ला सैन (रा. डाकबंगला-खेड) यांनी खेड पोलिस स्थानकात दाखल केली आहे.
तालुक्यातील साखरोली येथील रहिवासी असलेल्या एका एजंटाने परदेशात नोकरी लावण्याचे आमीष दाखवत १३ तरूणांकडून ऑनलाइन १४ लाख ३५ हजार रूपये स्वीकारले. या तरूणांना त्या माणसाने व्हिसा, परमिट, खोटी तिकिटे व काही कागदपत्रेही दिली. मात्र, हे सर्व बनावट असल्याचे समोर आले आहे. नोकरीला लावतो सांगून पैसे उकळून फसवणूक केल्याची तक्रार खेडसह दापोली पोलिस स्थानकातही दाखल करण्यात आल्याचे मोहम्मद सैन यांनी सांगितले.