पाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्याचा मुंबई - गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:46 PM2019-05-04T12:46:37+5:302019-05-04T12:47:45+5:30
अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावरील तुरळ (ता. संगमेश्वर) येथे शनिवारी पहाटे घडली. पाण्याच्या शोधात महामार्ग ओलांडत असताना वाहनाची धडक बसून हा अपघात झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आरवली : अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावरील तुरळ (ता. संगमेश्वर) येथे शनिवारी पहाटे घडली. पाण्याच्या शोधात महामार्ग ओलांडत असताना वाहनाची धडक बसून हा अपघात झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
उन्हामुळे नैसर्गिक स्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात इतरत्र फिरत आहेत. पाण्याच्या शोधासाठी मुंबई - गोवा महामार्ग ओलांडत असतान एका मादी बिबट्याला आपला जीव गमवावा लागला.
महामार्गाच्या पलिकडील बाजूला पाण्याचा स्रोत असल्याने तुरळ हरेकरवाडीकडून महामार्गावरून कडवई साळवीवाडी भागाकडे पाण्यासाठी अनेक वन्यप्राणी रात्रीच्या व पहाटेच्या वेळी ये - जा करताना दिसतात. हा बिबट्या पाण्यासाठीच आला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.
सकाळी या मार्गावरून प्रवास करताना रस्त्याच्या बाजूला हा बिबट्या पडल्याचे मुरडव गावचे पोलीस पाटील राजा मेने यांनी पाहिले. त्यांनी याबाबत वनविभागाला कल्पना दिली. परिमंडळ वनाधिकारी सुरेश उपरे वनरक्षक आनंद धोत्रे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले.
वाहनांच्या धडकेमुळे बिबट्याच्या मागील उजव्या पायाला मार लागला असून, जोरदार धडक मिळल्याने बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.