माधव भंडारी शनिवारी ‘सह्याद्री’च्या भेटीला
By admin | Published: May 4, 2016 10:02 PM2016-05-04T22:02:38+5:302016-05-04T23:48:42+5:30
दिनांक ७ मे रोजी तिवडी येथे पर्यटन दिनाचे आयोजन
चिपळूण : सह्याद्रीकडे पर्यटनाची प्रचंड संधी असतानाही आजपर्यंत कोणीही म्हणावे तसे लक्ष दिलेले नाही. प्रचंड जंगले आणि त्यातील वन्यजीव, उत्तुंग सह्याद्रीतील निसर्गसुंदर ठिकाणे आणि तेथील वन बांधवांची आगळीवेगळी संस्कृती याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी सह्याद्री विकास समितीतर्फे दिनांक ७ मे रोजी तिवडी येथे पर्यटन दिनाचे आयोजन केले आहे. यावेळी मार्गदर्शक म्हणून भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी उपस्थित राहणार आहेत. चिपळूण तालुक्यातील सह्याद्रीतील तिवडी या अत्यंत उंचावरील ठिकाणी शनिवार, दिनांक ७ मे रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले असून, यावेळी संस्था आणि वन विभागाच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीतर्फे पर्यटनाचा आराखडा शासकीय प्रतिनिधी म्हणून माधव भंडारी यांना देण्यात येणार आहे. यावेळी चिपळूण व दसपटी भागातील निसर्गप्रेमी कार्यकर्त्यांचा सत्कारही आयोजित करण्यात आला आहे. केवळ निसर्ग विषयासाठी अशा पद्धतीने सह्याद्रीमध्ये प्रथमच कार्यक्रम होत असल्याने सह्याद्रीतील बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सह्याद्री विकास समितीच्या माध्यमातून या पर्यटन दिनाची आणि माधव भंडारी यांच्या सह्याद्रीतील स्वागताची जोरदार तयारी चालू आहे.सर्व निसर्गप्रेमींनी या सह्याद्रीतील पर्यटन दिनाला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष प्रकाश पवार आणि सचिव योगेश भागवत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)