मग्रारोहयो नव्हे मरेगा; तीव्र संताप

By admin | Published: December 30, 2014 09:42 PM2014-12-30T21:42:11+5:302014-12-30T23:34:01+5:30

आराखडा नामंजूर : २१३ कोटींच्या आराखड्याला मात्र मंजुरी

Magarroeo will not die; Intense anger | मग्रारोहयो नव्हे मरेगा; तीव्र संताप

मग्रारोहयो नव्हे मरेगा; तीव्र संताप

Next

रत्नागिरी : मग्रारोहयो नव्हे मरेगा, अशी जोरदार टीका करुन ज्या यंत्रणेने काम केलेले नाही त्या यंत्रणेविरुध्द कारवाई प्रस्तावित करावी, असा ठराव आजच्या जिल्हा परिषदेच्या खास सभेत मंजूर केला़ तसेच केवळ ग्रामपंचायत यंत्रणेच्या २१३ कोटींचा आराखड्याला मंजूरी देत ४८ कोटींच्या शासकीय यंत्रणेच्या कामांचा आराखडा नामंजूर करण्यात आला़
यापूर्वीची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सन २०१५-१६च्या आराखड्याला मंजुरी देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली सभा स्थगित करण्यात आली होती़
त्यानंतर ही खास सभा जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्या अध्यक्षतेखाली मग्रारोहयोच्या आराखड्यास मंजुरी देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती़
आजच्या खास सभेच्या सुरुवातीला मग्रारोहयोचे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल सदस्य उदय बने, भगवान घाडगे, राजेश मुकादम, सदस्या रचना महाडिक यांनी आक्षेप घेतला़ याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी आजच्या सभेबाबत जिल्हा प्रशासनाशी चार वेळा संपर्क साधल्याचे सभागृहात स्पष्ट केले
आहे.
आज जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या सभेत शासन स्तरावरील एकही अधिकारी उपस्थित नव्हता़ त्याबद्दल सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत त्या-त्या यंत्रणेच्या कामाबाबत विचारणा केल्यास उत्तरे कोण देणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला़ त्यामुळे शासन स्तरावरील अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचा अपमान करण्यात आला आहे़ अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे़ त्यांच्याकडून जिल्हा परिषदेला अपेक्षित सहकार्य मिळत नाही. शासन स्तरावरील अधिकाऱ्यांनी अघोषित, असहकार पुकारलेला आहे, असा आरोप सदस्यांनी केला़
यावेळी जिल्हा परिषद सदस्यांनी मग्रारोहयोच्या कामांसाठी काही ग्रामपंचायतींची मॉडेल ग्रामपंचायती म्हणून निवड केली होती़ या ग्रामपंचायतीकडे तालुक्याचे अधिकारी गेले वर्षभर फिरकलेच नाहीत़, असा आरोप सदस्यांनी केला़ सन २०१३-१४ चा ८०८ कोटी रुपयांचा आराखडा असतानाही केवळ ५ कोटी रुपये खर्च झालेला आहे़ त्यामुळे या योजनेचा एक टक्काही खर्च झालेला नाही़
तसेच दापोली, चिपळूण, संगमेश्वर या तालुक्यांमध्ये वर्षभरात या योजनेचा एकही पैसा खर्च झालेला नसल्याने सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला़ दरम्यान, या योजनेचा विषय आता जिल्हा परिषद वर्तुळात गाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)


दि़ १ डिसेंबरपर्यंत मग्रारोहयोचा सन २०१५-१६च्या वार्षिक आराखड्याला मंजूरी देऊन तो ३१ डिसेंबर, २०१४ पर्यंत शासनाकडे पाठविणे आवश्यक होते़ तरीही जिल्हा प्रशासनाकडून त्यासाठी सभा न घेतल्याने अखेर जिल्हा परिषदेने आजची खास सभा आयोजित केली होती़ ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे़ तरीही जिल्हा प्रशासनाकडून या मग्रारोहयोचे प्रमुख अनुपस्थित राहिल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला़ या सभेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नायब तहसीलदार उपस्थित होते़ ते काहीही उत्तर देऊ शकले नाही़


मग्रारोहयोच्या कार्यालयीन खर्चासाठी जिल्हा परिषदेतील कक्षासाठी एकही पैसा देण्यात आलेला नाही़ या विषयीही सभागृहात जोरदार चर्चा झाली़

अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाईचा ठराव.
तीन तालुके एकही रुपया खर्चाविना.
मॉडेल गावात अधिकारी फिरकेच नाहीत.
सन २०१३-१४चा आराखडा ८०८ कोटींचा अन् खर्च केवळ पाच कोटींचा. योजनेचा एक टक्काही खर्च नाही.

Web Title: Magarroeo will not die; Intense anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.