जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या सेवेकऱ्यांची महाडला स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:31 AM2021-07-31T04:31:52+5:302021-07-31T04:31:52+5:30
रत्नागिरी : श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या ५ हजारांवर सेवेकऱ्यांनी महाड येथे मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविली. ...
रत्नागिरी : श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या ५ हजारांवर सेवेकऱ्यांनी महाड येथे मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविली. अनेक शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे, नागरिकांची घरे स्वच्छ करून दिली. रस्ते साफ केले. यावेळी मोठ्या प्रमाणात गाळ, माती, भिजून वाया गेलेले साहित्य एकत्र करून त्याची विल्हेवाट लावली. या मोहिमेत कचरा उचलण्यासाठी सुमारे शंभरावर डम्परची मदत घेण्यात आली.
संस्थानचे मुंबई, वसई, नवी मुंबई, पालघर, ठाणे या शहरांतील सेवेकरी काल रात्री महाडला मुक्कामास आले होते. त्यांची राहण्याची, जेवणाची, नाश्त्याची सोय करण्यात आली. सकाळी ८ पासूनच हे सेवेकरी महाडच्या शिवाजी चौकात सारे एकत्र जमले. त्यानंतर त्यांचे गट करून त्यांना वेगवेगळे विभाग वाटून देण्यात आले व एकाचवेळी सर्व महाडमध्ये मोहीम सुरू झाली. अतिशय नियोजनबद्ध हे काम सुरू झाले. सर्व गटांचे सुसूत्रीकरण वॉकीटॉकीद्वारे करण्यात येत होते.
महाड शहरात पाणी साचल्याने घरांत, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. लोकांचे धान्यापासून सारे साहित्य भिजून खराब झाले होते. तसेच सर्व शासकीय कार्यालयांत, सार्वजनिक ठिकाणी पाणी शिरून गाळ साचला होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील म्हणाले की, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानने महाड येथे राबविलेले स्वच्छता अभियान अभिमानास्पद आहे. त्यांचे सेवाकार्य पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. संस्थानची ही मोहीम सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत अखंड सुरू होती. अनेक सेवेकरी कुदळ, खोरी, पाट्या घेऊन आले होते. स्वच्छता करून कचऱ्याचे ढीगच्या ढीग रस्त्यावर गोळा करण्यात आले होते. नंतर हा सर्व कचरा डम्परमध्ये भरण्यासही त्यांनी मदत केली. त्यामुळे सारे महाड शहर एका दिवसात स्वच्छ झाले.
-----------------------------
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे मंगळवारी महाडमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.