स्पर्धक तेच, डावपेचही तेच, पक्ष नवेच; उदय सामंत यांच्याविरोधात उद्धवसेनेची प्रतिष्ठा लागली पणाला
By मनोज मुळ्ये | Published: November 2, 2024 11:21 AM2024-11-02T11:21:13+5:302024-11-02T11:22:31+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : याआधी दाेनवेळा (२००४ आणि २००९) उदय सामंत राष्ट्रवादीत असताना भाजपच्या बाळ माने यांच्याशी विधानसभेचा सामना झाला होता.
Maharashtra Assembly Election 2024 :रत्नागिरी : याआधी तीन निवडणुकांमध्ये ज्यांच्याशी सामना झाला, त्याच बाळ माने यांच्याशी मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात लढत होत आहे. उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना अशा या लढतीत विरोधकांना आपलेसे करुन घेण्याचे जुनेच डावपेच खेळले जाण्याची शक्यता अधिक आहे.
याआधी दाेनवेळा (२००४ आणि २००९) उदय सामंत राष्ट्रवादीत असताना भाजपच्या बाळ माने यांच्याशी विधानसभेचा सामना झाला होता. २०१४ मध्ये उदय सामंत (शिवसेना) आणि बाळ माने (भाजप) असा तिसरा सामना झाला.
तीनहीवेळा सामंत यांचा विजय झाला. यावेळी सामंत शिंदेसेनेत आणि माने उद्धवसेनेत आहेत. उद्धवसेनेसाठी ही लढाई प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे विराेधी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्याकडे घेण्याचे डावपेच सुरू झाले आहेत.
पडद्यामागच्या पक्षांतराला अधिक महत्त्व
दोनवेळा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवताना उदय सामंत यांनी विरोधी गटातील लोकांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले होते. यावेळीही उद्धवसेनेतील अनेकजण सामंत यांच्यासोबत जात आहेत. अर्थात पडद्यावरील पक्षांतरापेक्षा पडद्यामागील हालचालींना अधिक महत्त्व आहे.
पडद्यामागची पक्षांतरे उद्धवसेनेकडूनही होण्याची शक्यता आहे. भाजपमधील अनेकजण सामंत यांच्याबाजूला उभे असले तरी ते बाळ माने यांची साथ देण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
गेल्या पाच वर्षात उदय सामंत यांनी भाजपला जवळ न केल्याचा मुद्दा सातत्याने पुढे आणला जात आहे. तो कळीचा ठरणार आहे.
उद्धवसेनेमध्ये उमेदवार निवडीवरुन अस्वस्थता आणि नाराजी आहे. पक्षाशी निष्ठा असलेल्या नेत्यांना डावलण्यात आल्याचा मुद्दा गंभीर होत आहे.
लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?
लोकसभा निवडणुकीत भाजपचे नारायण राणे विजयी झाले. मात्र रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उद्धवसेनेच्या विनायक राऊत यांना १०,०३७ मताधिक्य मिळाले होते.
२०१९ मध्ये काय घडले ?
उदय सामंत (विजयी) १,१८,४८४
सुदेश मयेकर राष्ट्रवादी ३१,१४९
दापोदर कांबळे वंचित बहुजन आघाडी ४,६२१
नोटा - ४,५५२
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?
वर्ष विजयी उमेदवार पक्ष मते
२०१४ उदय सामंत शिवसेना ९३,८७६
२००९ उदय सामंत राष्ट्रवादी ७४,२४५
२००४ उदय सामंत राष्ट्रवादी ६३,२३३
१९९९ बाळ माने भाजप ४४,०००